परभणी (Parbhani):- माल वाहतूक करणार्या जड वाहनांना माल वाहतुकीबाबत नियम ठरलेले असतात. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Transport Offices) दंडाची आकारणी करण्यात येते. एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या दरम्यान ७५ वाहनधारकांना ६ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. क्षमतेपेक्षा अधिक भार वाहिल्याने या वाहनधारकांना दंडाचा मार बसला आहे.
क्षमतेपेक्षा अधिक भार; बसला दंडाचा मार..!
कमी खर्चात अधिक भार नेवून जास्त रक्कम कमविण्याच्या नादात वाहनधारक वाहनाच्या क्षमतेच्या अधिक माल वाहनामध्ये टाकतात. अशावेळी अपघात (Accidents)होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही दिवसात वाढलेले रस्ते अपघातामध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक हे देखील एक प्रमुख कारण आहे. अधिक पैसे कमविण्याच्या नादात वाहन चालक वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेतात. वाहनामध्ये त्याच्या मानकापेक्षा अधिक भार असेल तर अशा वाहनधारकांना दंड आकारणी करण्यात येते. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अशा वाहनांची तपासणी करत त्यांना दंड लावला जातो. नाकाबंदी, चेकपोस्ट तसेच फिरत्या पथकामार्फत ओव्हरलोड(Overload) वाहनांची तपासणी केली जाते.
मालवाहतूकदार शासनाने दिलेल्या मालाच्या क्षमतेच्या निमयमांचे पालन करत नाहीत
प्रत्येक माल वाहतूक करणार्या वाहनासाठी शासनाने माल वाहतुकीची क्षमता निश्चित केलेली आहे. त्यानुसारच माल वाहतूक करणे बंधरकारक असते. परंतु एका फेरीतून जादा पैसे मिळविण्यासाठी मालवाहतूकदार शासनाने दिलेल्या मालाच्या क्षमतेच्या निमयमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे ओव्हरलोड वाहने रस्त्यावर धावत असताना सर्रासपणे नजरेस पडतात. अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. वाहन चालविण्याचा परवाना (License) रद्द करण्याची कार्यवाही देखील करण्यात येते. रस्त्यावर वाढलेल्या अपघातांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक होणे हे देखील एक कारण आहे.