प्रहार: रविवार दि. 4ऑगस्ट 2024
लेखक : प्रकाश पोहरे,
*संपादक, दैनिक देशोन्नती, दैनिक राष्ट्रप्रकाश.
सरकारला ताळ्यावर आणायचे की आत्महत्या करायची?
रोज उत्पन्न वाढेल या आशेवर कोणी जे काय सांगेल ते प्रयोग करून करून अंगावर कर्ज वाढवून ठेवायचं काम शेतकऱ्यां कडून चालू आहे.
आज यश मिळेल , उद्या नफा होईल, हे केले तर पान रूंद होतात, ते केले तर पांढऱ्या मुळ्या सुटतात, अमुक फवारणी केली की वजन वाढते , अमुक खते घेतली की फुटवे चांगले निघतात. सगळे शेतकऱ्यांची फसवणूक करून पैसे कमावणारेच …. रास्त भाव , हमी भाव , एम एस पी , स्वामीनाथन , रंगनाथन ही मागणी केली की योग्य दर मिळेल, तो आयोग लागू झाला पाहिजे, मग उत्पन्न दिडपट मिळेल. असे ऐकून ऐकून दर वर्षी अनुभव घेत देत फक्त कर्ज वाढत गेले. खरच किती वर्षे हे प्रयोग करत जायचे ? एक एक प्रयोग फेल गेला की, नशीबाला दोष देत एक एक वावर कधी विकले हे शेतकऱ्यांना कळालच नाही. कर्ज काढून पाण्यासाठी पाईपलाईन केली, घरच औत असल तर नांगरट चांगली होते.. ट्रॅक्टर घेतला , शेणखता साठी जनावर केली, शेतीला जोडधंदा असावा म्हणून कोंबड्या – शेळ्या कर्ज काढून घेतली…..
कुणी सांगीतलं
शेततळ काढा ,
कुणी सांगीतलं
ड्रिप करा ,
मिरची लावा ,
कापुस लावा ,
भुईमुंग लावा ,
धान लावा ,
सोयाबिन लावा ,
द्राक्षे लावा ,
केळी लावा ,
डाळींब लावा ,
पपई लावा ,
वांगी लावा
हे लावा
ते लावा……
सगळे उद्योग केले आणि शेवटी थांबले, मात्र वाढल ते फक्त कर्ज आणि व्याज .!!!
सरकार कडून मिळालेली सवलत फसवी निघाली, दररोज चारा घालून वाढवलेल्या बोकडावर जस कापण्यासाठी अंगावर मांस वाढण्याची वाट पाहात सांभाळले जाते, तसे शेतकऱ्यांना बघण्याची सगळ्यांची दृष्टी !
खतवाला ,
औषधवाला ,
बॅंकवाला ,
सावकार ,
सरकार,
आडत्या ,
साखर कारखानदार ,
दुध संघवाला ,
जिनिंगवाला,
सगळे शेतकरी मान कापायला येतो कधी ह्याची वाट पाहणारेच शेतकरी मोठा व्हावा ही कोणाची इच्छाच नाही. बोकड जस मालकाची आपल्यावर मर्जी आहे अस वाटून उड्या मारत जगत असते, आणि शेवटी त्याला कळतं की यान आपल्याला का सांभाळले, तसे वेळ गेल्यावर कळत शेतकऱ्याला की आपल्याला अधिक उत्पादन वाढवायला का सांगीतले ते ! वर्षातून तीन तीन पीके घेऊन, पाणी पाजून पाजून, खत घालून घालून शेती नापीक होते, तरी पण प्रयोग कांही थांबत नाहीत. ज्याला त्याला विचारल तर म्हणतंय घरची शेती आहे, पडीक पाडायची काय? आणि पळून पळून प्रयत्न करून उत्पन्न डब्बल करायच्या नादात कर्ज डब्बल तिब्बल कधी होते कळतच नाही. खर आहे रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आमचं मन सुन्न करीत नाहीत .
त्यावर कुणीही बोलायला तयारच नाही. निसर्ग बदललेला पाणी नाही पाणी असल तर वीज नाही जे पाहिजे ते बियाणे मिळत नाही ते मिळाले तर खत मिळत नाहीत मिळाली तर ती घ्यायला पैसा नाही या सगळ्यातून वाचले आणि पिके आलीच तर जंगली जनावर पिके उध्वस्त करणार त्यातून वाचली तर भाव नाहीत मित्र म्हणून कुणी मदतीला नाही म्हणजे नाहीच, मात्र दुष्मानांची यादी संपतच नाही. शेती ही संस्कृती आहे, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, शेतकरी सुखी तर जग सुखी हे फक्त भाषणा पुरतेच उरलेले . घोषणा ऐकून ऐकून कान पिकले आहेत. शेती करणारा शेतकरी तिथेच मातीत गाडला जातो आहे, बापाच्या छातीवर हात ठेवून झोपणाऱ्या मुलांना विचारा एकदा की, तू का ठेवतो बापाच्या छातीवर हात ? तेंव्हा त्याचं उत्तर येते की, बाप जिवंत आहे का ? हे चेक करावे म्हणून ठेवावा लागतो हात ! शेतीवर कविता करणारे छान जगतात , शेतीवर कादंबरी लिहिणारे खुशाल जगतात , शेतकरी आत्महत्या वर पुस्तक लिहिणारे सुद्धामजेतच असतात शेती कशी करावी हे सांगणारे तर अधिकच मजेत आहेत. त्याने मत देवून निवडलेले तर फारच मजेत जगतात आणि वारंवार निवडून येतात शेतमाल विकणारे , भाजीपाला रस्त्यावर विकणारे घर बांधतात, प्रॉपर्टी विकत घेतात, छान आयुष्य जगतात आणि अनेक प्रकारची जोखीम पत्करून शेतमाल उत्पादन करणारे शेतकरी मात्र शेती का विकतात ? घर, सौंसार का बरबाद करतात ? आणि शेवटी आत्महत्या का करतात ?.. भयाण आहे हे सर्व, आमच्या शेतीची आणि शेतकऱ्यांची पार वाट लावून टाकली इथल्या राजकीय सत्तेने ! ह्या प्रश्नांचे उत्तर मागणी पुरवठयाच्या सुत्रा मधे आहे हे शेतकरी कधी समजून घेणार? शेतकरी आत्महत्यांचे खरे कारण आहे शेतीत आलेला तोटा आणि हा तोटा येण्यामागे कारण शेतीतील वाढलेला खर्च. आज जो शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळेआत्महत्या करतो आहे तोच शेतकरी 1960 – 65 च्या काळामध्ये बँकेमध्ये डिपॉझिट ठेवत होता, कारण एक क्विंटल कापूस विकला म्हणजे त्याला 30 ते 36 ग्रॅम सोने मिळायचे आणि खर्च होता अगदी नगण्य, कारण बी बियाणे, शेणखते घरची, मश्यागत बैलांद्वारे, मजुरांना मजुरी ज्वारीमध्ये दिल्या जायची. आज एक क्विंटल कापूस विकला की केवळ एक ग्रॅम सोने मिळते आणि त्याचबरोबर शेतीतील खर्च अफाट वाढलेला म्हणजे, संकरित बियाणे, रासायनिक खते सोबतीला कीटकनाशके, तणनाशके, मजुरांची मजुरी, वीज आणि मश्यागती करिता डिझेल व घर संसाराचे वाढलेले खर्च या सगळ्यांमुळे आणि तुलनेने न वाढलेले शेतमालाचे भाव, परिणामी ह्या खर्चिक शेतीमुळे त्याची कर्ज कधी फिटतच नाहीत, परिणामी वाढत्या आत्महत्या.!
लोकांना म्हणजे अगदी शेतकऱ्यांच्या शहरात राहणाऱ्या भावांना सुद्धा इतर कुठल्याही गोष्टीचे कितीही भाव वाढले तरी त्याची काहीही काळजी नसते मात्र खाण्यापिण्याच्या वस्तूचे थोडे बहुत भाव वाढले की त्याच्यावर आभाळ कोसळते. सरकार तर काय ते तर केवळ मतांवर जगते आणि त्याचमुळे इतर कुठल्याही गोष्टीचे कितीही भाव वाढले तरी त्यांना चिंता नसते. मात्र गरीब बिचाऱ्या जनतेला स्वस्तात पोट भरता आले पाहिजे म्हणून मग भलेही शेतकरी मेला तरी चालेल मात्र त्याचे शेतमालाचे भाव वाढू नयेत याकरिता साठा बंदी, झोन बंदी, निर्यात बंदी आणि आयात खुली, अशी सगळी यंत्रणा कामाला लावते. यातून बाहेर निघण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मागणी पुरवठ्याचा नियम समजून घेणे. मागणी पुरवठ्याचा नियम सांगतो की मागणी पेक्षा पुरवठा वाढला की भाव पडतात आणि मागणीपेक्षा पुरवठा कमी असला की भाव वाढतात. शेतकरी सुखी कधी होता तर जेव्हा शहरातील लोक “अन्नासाठी जगदिशा फिरवीशी दाही दिशा” अशा अवस्थेत होते. थोडक्यात जेव्हा शहरातील लोक उपाशी राहत होते तेव्हा शेतकऱ्यांना “अच्छे दिन” होते. ते अच्छे दीन जर पुन्हा आणायचे असतील तर मग मागणी पुरवठ्याचे सूत्र लक्षात घेऊन शेतकऱ्यांना वागावे लागेल.
त्याच्या समस्येचे उत्तर त्याच्याच हातात आहे मात्र “तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी” अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
आज देशामध्ये सरकारची गोदामे शेतमालांनी ओसंडून वाहत आहेत, परिणामी सरकार लोकांना मोफत धान्य देण्याचा “नादानपणा” करत आहे. अन्नधान्याचा म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, तूर , चणा, मूग, उडीद, इत्यादी सरळ खाण्याच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण केल्याशिवाय ही परिस्थिती सुधारणे शक्य नाही आणि त्याच करिता येणारी दोन-तीन वर्ष शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जे सरळ खाता येत नाही अशी उत्पादने म्हणजे मोहरी, करडी, सूर्यफूल, जवस, ताग म्हणजे ज्यूट, सोयाबीन किंवा ऊस, हळद, अद्रक, चारा पिके, बांबू फळे, ग्रीन फ्युएल याचे उत्पादन घेणे आणि त्यावर किमान प्रक्रिया उद्योग उभारणे. सरकारला ताळ्यावर आणायला इतका सोपा उपाय आहे, शेतकऱ्यांनो बोला, लाचारीचे जिणे संपवायचे आहे ? की … आत्महत्या करायची आहे ? की… आपल्यावर ही परिस्थिती आणलेल्यांना वठणीवर आणायचे आहे?*
जो काय निर्णय असेल मला संपर्क करा !!!
लेखक: प्रकाश पोहरे
प्रतिक्रिया देण्यासाठी 98225 93921 वर ‘थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सअप वर पाठवा.’ प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.