मानोरा (Manora):- तालुक्यातील ७८ पैकी जवळपास ३० गावात सार्वजनिक स्मशान भूमी (public cemetery) नसल्याने पावसाळ्यात उघड्यावर अंतिम संस्कार करण्याची पाळी नागरिकावर आलेली आहे.
उघड्यावर शेवटचा संस्कार करण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे
जन्म तेथे मृत्यू अटळ आहे. जीवन मग ते कोणाचेही असो जन्मापासून तर शेवटचा श्वास घेईपर्यंत या जगात कठीण प्रसंगाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. तालुक्यातील ७८ पैकी ३० ग्रा. पं. ना अद्याप स्मशानभूमीच शासनाकडून बांधून देण्यात आलेली नाही. परिणामी स्वतःच्या किंवा इतरांच्या शेतात अथवा नदी, नाल्याकाठी, उघड्यावर शेवटचा संस्कार करण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे. सध्या पावसाळा(Rainy season) सुरू झाल्याने सरण विझण्याच्या बिकट प्रसंगास प्रियजनांना व स्नेहींना सामोरे जावे लागत असल्याने नागरिकाकडून वर्षानुवर्षे नाराजीचे सूर उमटत आहेत. ग्रामविकास प्रशासनाकडे स्मशानभूमीसाठी मागील तीन वर्षापासून सतत मागणी करूनही या गंभीर समस्येकडे प्रशासन तत्परतेने लक्ष देण्यास तयार नाही.
अग्नी देण्याकरिता आवश्यक असलेले टिनशेड सुस्थितीत नसून शवदाहिनींची दुरावस्था
तालुक्यात ७८ ग्रामपंचायती आणि ११३ गावे आहेत. त्यातील अधिकांश गावामध्ये स्मशानभूमी (cemetery) नवापूरतीच उभी आहे. अनेक ठिकाणी मृतदेहास अग्नी देण्याकरिता आवश्यक असलेले टिनशेड सुस्थितीत नसून शवदाहिनींची दुरावस्था झालेली आहे. स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते कच्च्या स्वरूपातील असल्याने पावसाळ्यात अंत्यविधीला येणाऱ्यांना चिखल तुडवत स्मशान भूमीत पोहचावे लागते. स्मशानभूमीच्या परिसरात उगवणारी निरुपयोगी काटेरी झाडे, गवत ही डोकेदुखी आजही कायम आहे.
विशेष गंभीर बाब म्हणजे १५ ग्रामपंचायतींना अद्याप स्मशानभूमीस मिळालेली नाही. शहरालगत असणाऱ्या सोमठाणा, शेंदुरजना, ईंगलवाडी आदी मोठ्या ग्रामपंचायतीतील गावात कोणाचा मृत्यू झाल्यास मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागते.
पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर होतो त्यामुळे गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी असणे आवश्यक
संततधार पाऊस सुरू असल्यास अशा प्रसंगी बिकट समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. जीवन जगत असताना विविध समस्यांचा धैर्याने सामना करणाऱ्यांची मृत्यूनंतर तरी अवहेलना व्हायला नको, यासाठी प्रत्येक ठिकाणी बैठक व्यवस्थेसह सुसज्ज मशानभूमी असणे गरजेचे आहे, उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात (Winter)अडचण जाणवत नाही; मात्र पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर होतो त्यामुळे गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी असणे आवश्यक आहे.