नागपूर(Nagpur):- एकेकाळी भाजपचे निष्ठावान समजले जाणारे आणि नंतर काँग्रेसवासी (Congress) झालेले माजी उपमहापौर छोटू ऊर्फ रविंद्र भोयर यांना बुधवारी सकाळच्या सुमारास गुन्हे शाखा पोलिसांनी रेशीमबाग येथील राहत्या घरून अटक केली.
पूनम अर्बन सोसायटीमध्ये ३.४१ कोटींचा घोटाळा
पूनम अर्बन क्रेडिट को ऑप. सोसायटीच्या संचालक मंडळावर कार्यरत असतांना ३ कोटी ४१ लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या घोटाळ्यात सोसायटीचे इतरही संचालक व व्यवस्थापक आरोपी आहेत. दुसरीकडे आरोपी भोयर यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. अटकेनंतर पोलिसांनी आरोपी छोटू भोयर यांना न्यायालयात (Courts) हजर केले असता २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, आरोपी रवींद्र ऊर्फ छोटू भोयरहे २०१९ मध्ये पूनम अर्बन क्रेडिट को ऑप. सोसायटित संचालकपदी होते. त्यावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व संचालकांसह व्यवस्थापकाने सोसायटीच्या माध्यमातून विविध जमा व बचत योजनांचा धडाका लावला.
न्यायालयाने सुनावला २५ जानेवारीपर्यंत पीसीआर’
भरघोस लाभ आणि परताव्याचे आमिष दाखवून ग्राहकांना जाळ्यात ओढून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सोसायटित संचालक असलेले छोटू भोयर(Chotu Bhoyar) यांची राजकीय पार्श्वभूमी बघता अनेक जण भरघोस नफ्याच्या आमिषाकडे आकर्षिल्या गेले आणि येथेच सोसायटीच्या संचालकांवर विश्वास ठेवणे गुंतवणूकदारांच्या चांगलेच अंगलट आले. या सोसायटित जवळपास शंभराच्यावर ग्राहकांनी ३ कोटी ४१ लाख रुपये गुंतविले. बराच कालावधी लोटल्यानंतरही त्यांना निर्धारीत कालावधीत नफ्यासह मुद्दल रकम परत मिळाली नाही. सोसायटित विचारपूस करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना ठोस उत्तर मिळत नव्हते.
छोटू भोयर यांना पोलिसांनी हात लावला नव्हता
अखेर त्रस्त ग्राहकांनी पोलिसांकडे धाव घेतली. सकरदरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून संचालक मंडळातील सदस्यांना अटक केली. आतापर्यंत दहा आरोपींना अटक झाली आहे. मात्र, छोटू भोयर यांना पोलिसांनी हात लावला नव्हता. त्यामुळे पीडित गुंतवणूकदारात प्रचंड नाराजीची भावना निर्माण झाली होती. शेवटी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तपासाअंती आरोपी छोटू भोयरयांच्या बुधवारी सकाळी राहत्या घरी मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पुढील चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.