लातूर(Latur) :- राज्यामध्ये आज पुन्हा शेतकरी संकटात आहे. बेरोजगारी वाढली आहे, गुन्हेगारी वाढली आहे, दिवसाढवळ्या पोलीस ठाण्यात आमदार दुसऱ्यावर गोळी झाडतो… अशा घटनांवर सरकारचे नियंत्रण नाही. या राज्यातले उद्योग गुजरातला पळविले जातात आणि अशा उद्योगांचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री करतात. केवळ एका राज्याचा विचार करणाऱ्या पंतप्रधानांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे रोखठोक प्रतिपादन महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी केले.
आमचे सरकार सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी
आमचे सरकार सत्तेवर आल्यास या राज्यात शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी देईल. तसेच बेरोजगारांना दरमहा चार हजार रुपये देईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघात (Assembly constituencies) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सुधाकर भालेराव यांच्या प्रचारार्थ शनिवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे (Congress)नेते माजी मंत्री अमित देशमुख, उमेदवार सुधाकर भालेराव, माजी खासदार सुधाकर शृंगारे, खासदार फौजिया खान, राष्ट्रवादीचे नेते बसवराज पाटील नागराळकर यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे नेते मंचावर उपस्थित होते.
सरकारने बाहेरच्या देशातून सोयाबीन आयात केले
शरद पवार म्हणाले की, या देशातील इथेनॉल साखर कांदा सोयाबीन आदींना निर्यात बंदी करून सरकारने बाहेरच्या देशातून सोयाबीन आयात केले. सोयाबीनच्या उत्पादनाचा खर्चही निघत नाही, असा भाव यामुळे सोयाबीनला मिळत आहे. परिणामी आज पुन्हा शेतकरी संकटात आहे. जो शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतो, त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे सांगत महाविकास आघाडीच्या हातात सत्ता द्या, महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांच्या मदतीने आपण राज्य पुन्हा प्रगतीपथावर आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान
राज्यातले अनेक कारखाने गुजरातला गेले राज्याचे उद्योग बाहेर जाणे हे राज्यावरील संकट आहे. हे संकट टाळायचे असेल तर राज्याच्या सत्तेत बदल झाला पाहिजे. त्यासाठी परिवर्तन होणे आवश्यक आहे. आपण जागी राहिलो तर हे बदलू शकता, असे सांगून महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडीला निवडून दिले तर महिलांना दरमहा हजार रुपये, मोफत बस प्रवास, शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान, जातनिहाय जनगणना, बेरोजगारांना दरमहा चार हजार रुपये भत्ता तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकाला 25 लाखाचा आरोग्य विमा व मोफत औषधोपचार देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख, खासदार फौजिया खान, माजी खासदार सुधाकर शृंगारे, बसवराज पाटील नागराळकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्यासह उमेदवार भालेराव यांची भाषणे झाली. या सभेला उदगीर जळकोट तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.