मानोरा (Washim) :- विधानसभा निवडणुकीची रंगत चांगलीच वाढत चालली आहे. एकीकडे दिवाळी सण तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) रणासंग्रामाने वातावरण निर्मिती झाली आहे. परिणामी निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांना नामांकन दाखल करण्यासाठी उद्याचा २९ ऑक्टोंबर हा अंतिम दिवस आहे. त्यामुळे आज अंतिम दिनी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच गर्दी उसळणार आहे. नामांकन दाखल करण्यासाठी काही बड्या नेत्यासह इच्छूक समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करणार आहेत. यामुळे रिंगणातील चित्राकडे लक्ष लागले आहे.
महायुती आणि महा विकास आघाडीचे मित्रपक्ष विधानसभेची निवडणूक लढवत आहेत
कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघात महायुती आणि महा विकास आघाडीचे मित्रपक्ष विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. आप आपल्या जागेचा तिढा सोडवून उमेदवारही जाहीर केले आहे. त्यातच २२ ऑक्टोंबर पासून नामांकन अर्जाची उचल आणि अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया निवडणूक विभागाने सुरू केली. यामुळे विधानसभा क्षेत्रात राजकीय पक्षाच्या पुढारीसह निवडणूक लढविण्याच्या बेतात असलेले हवसे नवसे अर्जांची उचल करून नामांकन दाखल करीत आहेत. आज नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी चांगलीच गर्दी उसळणार आहे. काही बड्या नेत्यांसह राजकीय वर्तुळातील इतर बंडखोर तसेच इच्छूक आप आपल्या रितीने तयारी करून शक्ती प्रदर्शनाचा बेत आखून नामांकन दाखल करणार आहेत. निवडणूकीत भाग्य आजमावण्यासाठी किती उमेदवार रणसंग्रामात उडी घेतात. याकडे लक्ष लागले आहे.