Nashik :- गेल्या चार महिन्यांपूर्वी 294 हून अधिक शेतकऱ्यांनी तीन कोटी रुपयांच्या जवळपास पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीत टोमॅटो विक्री केला होता. चार महिने उलटून गेल्यानंतरही व्यापाऱ्यांकडून उडवाउडीची उत्तर मिळत असून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कुठली दखल घेत नसल्यामुळे संतप्त झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू करत ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत कुठलेही लिलाव होऊ देणार नाही. आंदोलन असेच सुरू राहील अशी भूमिका घेतल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तातही वाढ झाली आहे. अद्याप बाजार समितीकडून या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी कोणी आले नसल्याने शेतकऱ्यांच्या (Farmers) भावना संतप्त झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.