महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यावर पेरणीपूर्वी संकट
परभणीतील पाटोदा शिवारात दुर्घटना
परभणी/पाथरी (Parbhani Bull died) : परभणीच्या पाथरी तालुक्यातील पाटोदा (गंगा किनारा) गाव शिवारामध्ये विद्युत प्रवाहित तारा रस्त्यावर पडल्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी ८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये बैलगाडी चालवणारे शेतकरी अशोक कदम थोडक्यात बचावले असून, पेरणीच्या तोंडावर बैल (Parbhani Bull died) दगावल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.
या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार , स्थानिक शेतकरी अशोक कदम हे बैलगाडीतून पीव्हीसी पाईप घेऊन शेताकडे जात असताना गाव शिवारातील गट क्रमांक १४ व १५ मधील रस्त्यावर विद्युत पोलवरून तुटलेल्या तारा पडलेल्या होत्या. याच रस्त्यावरून काही वेळापूर्वी जेसीबी यंत्र गेले असल्यामुळे त्या तारांमध्ये विद्युत प्रवाह नसल्याचा समज त्यांनी करून घेतला. त्यांनी बैलगाडी पुढे नेल्यावर (Parbhani Bull died) विद्युत प्रवाह बैलांच्या पायाला लागल्याने दोन्ही बैल जागीच मृत्यूमुखी पडले. गाडीत असलेल्या प्लास्टिक पाईपमुळे अशोक कदम यांना सौम्य झटका बसला, मात्र समयसूचकतेमुळे ते बचावले.
दरम्यान, पाटोदा शिवारात १४ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसामुळे विद्युत पोल कोसळले होते व अनेक ठिकाणी तारा तुटून पडल्या आहेत. ग्रामस्थांनी वारंवार महावितरणकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याच निष्काळजीपणामुळे ही जीवघेणी दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेनंतर महसूल विभागाला माहिती देण्यात आली असून, घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही बैलांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान शेतकर्याकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.