परभणी (Parbhani):- शहरातील विसावा कॉर्नर येथे खड्ड्यात पाणी साचल्यामुळे व बॅरिकेट लावल्यामुळे अर्ध्यातासापेक्षा अधिक काळ वाहतुक कोंडी (Traffic congestion) गुरूवार ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाली.
परभणीच्या शहरातील विसावा कॉर्नर येथील घटना
जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर येथे जिंतूरकडे जात असतांना रस्त्याच्या बाजूला एक मोठा खड्डा पडलेला आहे. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे अपघाताची शक्यता असल्या कारणाने पोलीस प्रशासनाने बॅरिकेट लावले होते. रस्त्यावर बॅरिकेट (Barricade) लावल्यामुळे जवळपास अर्धा रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. जिंतूरकडे जाणारी आणि जिंतूरहून येणारी वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. खड्ड्यांमुळे वाहनधारक सुध्दा रस्त्यावरील खड्डा सोडून उर्वरित भागातून जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेकवेळा एकाच वेळी वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. खरे तर हा खड्डा खूप दिवसांपासून पडलेला आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत या खड्ड्याची दुरूस्ती करणे आवश्यक होती. मात्र महामार्ग प्रशासनाने याकडे कोणतेही लक्ष दिले नाही व रस्ता दुरूस्ती केली नाही. त्यामुळेच पावसाळ्यात वाहनधारकांना होणारी वाहतुक कोंडीची गैरसोय(Inconvenient) सहन करावी लागत आहे. आतातरी यावर महामार्ग प्रशासन जागे होऊन दखल घेणार का ? हा प्रश्न नागरीकांमधून विचारला जात आहे.
महामार्ग प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी
शहरातील विसावा कॉर्नरहून जिंतूरकडे जातांना रस्त्याच्या बाजूला पडलेला खड्ड्यामुळे वाहनधारकांना अडथळा ठरत आहे. पाऊस पडल्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास दुचाकीस्वारांना खोलीचा अंदाज आला नसल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच त्या खड्यांमुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने तात्काळ खड्डा बुजवून द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांकडून करण्यात येत आहे.