परभणी/जिंतूर(Parbhani):- शहरातील मुख्य रस्त्यावर विविध सामाजिक संघटनेने लावलेली झाडे विकासाचा नावाखाली तोडण्यात आली होती दरम्यान झाडे तोडताना एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावण्याच्या अटीवर प्रशासनाने परवानगी दिली. मात्र, अद्यापही संबंधीत कंत्राटदार (contractor)व सा बा विभागाने झाडे लावण्याची तसदी घेतली नसल्यामुळे येत्या आठ दिवसात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावा. अन्यथा आंदोलन छेडण्याचा ईशारा दिनांक 25 जुलै रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.
सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी झाडे तोडण्यास विरोध दर्शविला होता
याबाबत अधिक माहिती अशी की,शहरातील अण्णा भाऊ साठे चौक ते यलदरी रोडवर दुतर्फा शहरातील सामाजिक संघटना, व्यापारी यांनी झाडे लावून जगविण्यात आली होती. ही सर्व झाडे मोठी झाल्यावर शहरातील विकास कामासाठी झाडे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी झाडे तोडण्यास विरोध दर्शविला होता, यावेळी मोठा संघर्ष निर्माण झाला असल्यामुळे तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. यामध्ये एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावून जगविण्यात येतील असे सांगितले होते, परंतु सध्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले असून रस्त्यावर कोठेही झाडे लावली नसल्यामुळे संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाली आहे.
दुतर्फा झाडे लावली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
याबाबत निवेदन देऊन येत्या आठ दिवसात शहरातील रस्त्यावर दुतर्फा झाडे लावली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, माजी सैनिक बालाजी शिंदे, अँड माधव दाभाडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.