परभणी जिल्ह्यातील रुग्ण शोधुन उपचार केले जाणार
परभणी (Tuberculosis Campaign) : राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ७ डिसेंबर ते २७ मार्च २०२५ या कालावधीत शंभर दिवस क्षयरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याहस्ते जिल्हा नियोजन समितीच्या मुख्य सभागृहात आयोजीत कार्यक्रमात झाले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. कौस्तुभ दासगुप्ता, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर पोले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, डॉ. संजय हरबडे, जयश्री दिपके यांची उपस्थिती होती. या मोहिमेत अधिकाधीक क्षयरुग्ण शोधुन त्यांना उपचारात आणणे, क्षयरुग्णांचा मृत्यू दर कमी करणे, नवीन रुग्णांची संख्या कमी करणे, आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे, क्षयरोगाबद्दल जनजागृती आणि सामाजिक कलंक कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. परभणी जिल्ह्यात शंभर दिवसांची मोहिम राबविण्यात येणार आहे.
निवडक जोखमीच्या भागात सर्वेक्षण केले जाईल. अनाथाश्रम, वृध्दाश्रम, औद्योगिक संस्था, निवासी शाळा, तुरुंग, चाचणी शिबीरे आदी ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. उच्च जोखीम असलेल्या गटापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा प्रदान करणे, क्षयरोग रुग्णांना निक्षय मित्रांकडून पोषण आहार किटचे वाटप करण्यात येणार आहे.
सदर मोहिम राबविण्यासाठी टिबी चॅम्पीयन्सची मदत घेतली जाणार आहे. चाचणी पॉझिटिव्ह आलेल्यांवर टिपीटि सुरू करण्यात येणार असल्याचे क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर पोले यांनी सांगितले.
जिल्हा क्षयमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत
शंभर दिवस क्षयरोग निर्मुलन मोहिमेमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. मोहिमेत ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, मधुमेही, धुम्रपान करणारे व्यक्ती, क्षयरोग रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती, १८ पेक्षा कमी बीएमआय असलेला व्यक्ती आदींचा शोध घेतला जाणार आहे. सन२०२५ पर्यंत जिल्हा क्षयमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत. – रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी.