चालू हंगामात वर्ष अखेरच्या दिवशी मिळाला नीचांकी 6651 भाव
लातूर (Turi prices) : लातूरच्या आडत बाजारामध्ये पुन्हा एकदा तुरीचे दर नीचांकी पातळीवर गेले आहेत. बाजारात वर्ष अखेरीच्या दिवशी तुरीची 3613 क्विंटलची विक्रमी आवक झाली. असे असतानाही तुरीचे दर मात्र नीचांकी पातळीवर गेले असून, या हंगामात प्रतिक्विंटल मागे तुरीचे दर जवळपास साडेतीन हजार रुपयांनी घसरले आहेत. शेतकऱ्यांची या हंगामातील ही मोठी शोकांतिका आहे.
डाळींचे उत्पादन करणारे मोठे केंद्र म्हणून लातूरची देशात ओळख आहे. (Turi prices) तूर डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ निर्मितीचे लातूरच्या उद्योग क्षेत्रातील मोठे उद्योग आहेत. लातूरच्या मार्केटमध्ये त्यामुळेच तुरीच्या निघणाऱ्या दराबाबत अधिक महत्त्व शेतकऱ्याकडून दिले जाते. लातूरच्या बाजारात निघालेल्या दरावर राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये डाळींचे दर ठरतात. इतकेच नव्हे, तर लातूरला निघालेल्या डाळींच्या दरावर इतर राज्यातही दर काढले जातात. मात्र यावर्षी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला दर मिळाले नाहीत.
हमी भाव प्रतिक्विंटल 7550 रुपये असतानाही लातूरच्या आडत बाजारात किमान प्रति क्विंटलचे दर 6190 वर आले. याच हंगामात लातूरच्या आडत बाजारात 22 नोव्हेंबर रोजी तुरीला प्रतिक्विंटल सरासरी 10250 तर कमाल दर 11000 मिळाला होता. त्या तारखेच्या तुलनेत आज रोजी लातूरच्या आडत बाजारात प्रतिक्विंटल मागे साडेतीन हजारांनी म्हणजे 3599 रुपयांनी दर घसरले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही मोठी शोकांतिका मानली जात आहे.