चार जण जखमी, तीघांची प्रकृत्ती चिंताजनक
परभणी (Yeldari Road Accident) : जिंतूूूर तालुक्यातील येलदरी गावाजवळील रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यापैकी तिघांना प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना बुधवार ११ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
येलदरीकडे जाणार्या रस्त्यावर भरधाव वेगाने येणार्या दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्याने चौघेही रस्त्यावर फेकले गेले. (Yeldari Road Accident) अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात तसेच १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. घुगे व चालक पवार, नगरसेवक फेरोज कुरेशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात शोएब नसीर पठाण (वय २४), मुफ्ती मुजमेल शेरू कुरेशी (वय २४), मौलाना मुजमिल रियाज कुरेशी (वय २६) व मौलाना गुफराना रफिक कुरेशी (वय २७, सर्व रा. जिंतूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. चौघांनाही हात, पाय व डोक्याला मार लागला आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मुद्दसीर यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्टर घातगीने, सिस्टर नाईक, सिस्टर सीमा कांगणे व कक्षसेवक गंगाधर पालवे यांनी जखमींवर उपचार केले.
दरम्यान, बातमी लिहीपर्यंत या (Yeldari Road Accident) घटनेची जिंतूर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.




