हिंगोली(Hingoli):- हिंगोली ते सेनगाव मार्गावर पुसेगाव पाटीवर २० ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू (Death) झाला असून एका गंभीर जखमी व्यक्तीवर नांदेड रूग्णालयात उपचार सुरू आहे.
हिंगोली-सेनगाव मार्गावरील पुसेगाव पाटीवरील घटना
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील बबन श्रावण धाबे, गौतम राघोजी धाबे व शेख सत्तार शेख नबी हे पुसेगाव पाटीवर एका ढाब्यावर वेटर म्हणून कामाला होते. नेहमीप्रमाणे तिघेजण २० ऑक्टोंबर रोजी ढाब्यावरील काम आटोपून मोटार सायकलवरून रात्री १० च्या सुमारास जात असताना सेनगावकडून हिंगोलीच्या दिशेने भरधाव वेगात येणार्या कारने पुसेगाव पाटीवर मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने त्यावरील शेख सत्तार शेख नबी (५०) हे जागेवरच ठार झाले तर गौतम राघोजी धाबे, बबन श्रावण धाबे या दोन्ही गंभीर (Injured)जखमींना पोलिसांनी तात्काळ हिंगोली येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता गौतम राघोजी धाबे (५०) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या बबन धाबेवर हिंगोलीत उपचार करून पुढील उपचारा करीता नांदेड रूग्णालयात (hospital) हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नर्सी नामदेव ठाण्याचे पोलीस निरीक्षक बद्रीनाथ सानप, पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव, जमादार गणेश नरोटे, विलास कुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेबाबत मंगळवार पर्यंत नर्सी नामदेव पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.