कळमनुरी/हिंगोली (UBT Santosh Tarfe) : विधानसभा निवडणुकीकरीता शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे उमेदवार डॉ. संतोष टारफे (UBT Santosh Tarfe) यांनी तोडीस तोड शक्तीप्रदर्शन करून आ. संतोष बांगर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
चार दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी मोठी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या शक्तीप्रदर्शनाला तोडीस तोड उत्तर देत शिवसेना उबाठाच्या डॉ.संतोष टारफे यांनी विशाल रॅली काढून उमेदवारी दाखल केली. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये डॉ. संतोष टारफे (UBT Santosh Tarfe) यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या डॉ.प्रज्ञा सातव, शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रभारी बबनराव थोरात, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील सावंत, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब मगर, शिवाजी शिंदे पुयणीकर, मारोतराव खांडेकर, कांतराव शिंदे, एस.पी.राठोड, श्रावण चव्हाण, एम.जे.राठोड, अशोक कर्हे, शरद पोले आदींसहीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. बांगरांकडे कोट्यावधींची मालमत्ता आली कोठून?
आमदार संतोष बांगर यांच्याकडे आलेली कोट्यावधींची मालमत्ता ेनेमकी कोठून आली, याचे उत्तर त्यांनी जनतेसमोर द्यावे असा घणाघात शिवसेना उमेदवार डॉ.संतोष टारफे यांनी मतदारांशी संवाद साधतांना केला. आपण आमदार झालो तर ‘इडी’ची पहिली चौकशी संतोष बांगर यांची करणार असेही डॉ. टारफे (UBT Santosh Tarfe) म्हणाले. मतदार संघातील गरजू लोकांना मदत केल्याचा व्हिडीओ बनवायचा आणि आपल्या प्रचारासाठी तो व्हायरल करून गरिबांची थट्टा उडवायची, यामुळे अनेकजण दुखावले गेले आहेत, असेही ते म्हणाले. सबंध पाच वर्षे सत्तेत राहूनही निवडणुकीच्या समोर पैसे वाटावे लागतात याचा अर्थच असा आहे की, आपल्या कार्यकाळात बांगर यांना मतदार संघात विकास कामे करताच आली नाहीत. सरतेशेवटी ही निवडणूक काळा पैसा विरूद्ध स्वच्छ चारित्र्य अशी होणार असल्याचे सांगून डॉ.संतोष टारफे यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.