तेल, तांदूळ, गहू, साखर व डाळींचे दर पाच वर्षे स्थिर ठेवणार!
– महादेव कुंभार
लातूर (Uddhav Thackeray) : महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना मुंबई आणि मुंबई परिसरात घरे देणार, असे सांगून महाराष्ट्रातील तरुण- तरुणींनो मुंबईत या, असे आवाहन केले. आमचे सरकार आल्यास महाराष्ट्रात तेल, तांदूळ, गहू, साखर व डाळी या पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर पाच वर्षे स्थिर ठेवले जातील, अशी घोषणाही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.
निलंगा तालुक्यातील कासारशिरशी येथे महाविकास आघाडीच्या झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख व अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी भाजपा व महायुती सरकारचा जोरदार समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ थापा मारतात. 2014 च्या निवडणुकीत प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकतो म्हणाले होते, असे सांगून 15 लाख खात्यावर पडलेला एक तरी माणूस आहे का? असा सवाल त्यांनी केला.
देशाचे काम सोडून मोदी व अमित शाह महाराष्ट्राच्या गल्लीबोळात फिरत आहेत. आज सोलापूरला त्यांची सभा आहे. सभांमध्ये ते माझ्यावरच बोलतात, विकासावर बोलत नाहीत, असे सांगून ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, सोलापूरच्या विमानतळावर मोदींचे विमान उतरणार म्हणून माझे विमान उतरण्यास आज बंदी करण्यात आली. देशात ही हुकूमशाही वृत्ती चालणार नाही, असे सांगून काल माझी बॅग तपासली, चांगली गोष्ट झाली; मात्र मोदी व अमित शहा यांच्याही बॅगा तपासा, असे जाहीर आवाहन त्यांनी निवडणूक आयोगाला केले.
राज्यात सोयाबीनच्या प्रश्नावरून शेतकरी सध्या चिडलेला आहे. त्यामुळे मंत्रालयात काहीतरी हालचाली होत आहेत. खरेदी केंद्रांकडून अमुक इतकी सोयाबीन खरेदी झाली, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने काही खोट्या बातम्याही देण्याचा प्रयत्न आहे. मात्र कितीही खोटे दिले तरी सोयाबीन शेतकऱ्याच्या दारी पडून आहे, हे लपून राहणार नाही. महाराष्ट्राला लुटणाऱ्या अशा महायुतीला घालवा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.