हा ठाकरेंचा शब्द; टाळ्यांच्या कडकडाटात “मातोश्री”वरील चर्चा सभेत जाहीर!
बुलढाणा (Uddhav Thackeray) : जेव्हा 40 गद्दार पळून गेले, तेव्हा बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना सांभाळली ती.. नरुभाऊ खेडेकर व जालिंदर बुधवत या शिलेदारांनी. त्याचवेळी नरूभाऊंना लोकसभेसाठी तर जालिंदर बुधवत (Jalindar Budhwat) यांना विधानसभेची तयारी करायची सांगितली होती. नरूभाऊंचा निसटता पराभव झाला, अर्थात तो प्रचंड जिव्हारी लागला.. त्याचवेळेस एक गद्दार गाडला गेला असता तर आता दुसरा. मात्र जे झाले ते झाले, ती चूक आता होऊ देऊ नका.. पेटलेली मशाल हृदयात धगधगत ठेवा, कुठल्याही परिस्थितीत जयश्रीताईंना निवडून आला.. असं सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी, जालिंदर बुधवत यांना कसे थांबविले ? हा “मातोश्री”वरचा किस्सा आज जाहीरपणे सांगितला तो बुलढाण्याच्या भव्य सभेत!
बुलढाणा येथे आज शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री सुनील शेळके (Jayshree Shelke) यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा आयोजित करण्यात आली होती. भाषणाला उभे राहण्यापूर्वी सूत्रसंचालक गजानन धांडे यांनी, “जालिंदर बुधवत म्हणजे “मातोश्री”वरची निष्ठा.. त्यांना वाऱ्यावर सोडू नका साहेब !” असे आर्जव केले. त्यामुळे भाषणाच्या सुरुवातीलाच जालिंदर बुधवत यांना कोणता शब्द देऊन थांबवले ? हे उद्धव ठाकरे यांनी हजारोंच्या साक्षीने सांगितले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, जालिंदर बुधवत (Jalindar Budhwat) यांना विधानसभेसाठी आधीच तयारीला लागण्याची सांगितले होते. परंतु वेळेवर परिस्थिती अशी निर्माण झाली की जयश्रीताईंना उमेदवारी द्यावी लागली. त्यावेळी बुधवत त्यांना म्हटले- तुम्हाला थांबावे लागते. क्षणाचाही विलंब न करता जालिंदर बुधवत त्यांनी “साहेब, तुमचा आदेश” म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला. कुठलेही आर्ग्युमेंट बुधवत यांनी केले नाही. त्यावेळी मात्र बुधवत यांना सांगितले की, “या निवडणुकीत आपले आमदार वाढणार आहेत. अशावेळी आमदारांमधून जो विधान परिषदेचा आमदार निवडला जातो, ती संधी तुम्हाला नक्कीच देऊ.. आणि आज या बुलढाण्याच्या जाहीर सभेतून सांगतो की, बुलढाण्यातून पुढचा एमएलसी. चा आमदार हे जालिंदर बुधवतच राहतील. हा ठाकरेंचा शब्द आहे !” उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) या स्पष्टीकरणावर व शब्दावर गर्दीतून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
एकाअर्थाने बुलढाण्याची आजची उद्धव ठाकरेंची सभा ही, एका आमदारासाठी नव्हती तर भविष्यातील दोन-दोन आमदारांसाठी होती. एक विधानसभेच्या तर एक विधान परिषदेचा. एक जयश्रीताई शेळके, तर दुसरे जालिंदर बुधवत (Jalindar Budhwat) !