लातूर (Udgir Assembly Constituency) : गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः लोकसभा निवडणुकीपासून (Lok Sabha Elections) उदगीरमध्ये संघ शिस्तीतले भाजपा कार्यकर्ते (BJP-NCP) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दरी निर्माण झाली असून दोन्ही पक्षातील मतभेदाचे लोंढे या दरीतून वाहत असल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. उदगीरमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटनाला येण्याचे टाळत पालकमंत्री (Girish Mahajan) गिरीष महाजनांनीही अखेर उदगीरमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांची पाठराखण केल्याचे बोलले जात आहे.
उदगीर येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते होईल, अशी माहिती यापूर्वी संबंधित विभागाने व प्रशासनाने जाहीर केली होती. इतकेच नव्हे, तर या कार्यक्रमास मराठवाड्यातील विधान परिषद सदस्य तसेच लातूर जिल्ह्यातील संसद सदस्य व विधानसभा सदस्य उपस्थित राहतील, असेही याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रशासनाने म्हटले होते. गिरीश महाजन हे लातूरचे पालकमंत्री असले तरी ते भाजपाचे मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये विशेषतः (Udgir Assembly Constituency) उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (BJP-NCP) भूमिकेबाबत संघ शिस्तीत वाढलेल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. ज्या अजित पवारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेतृत्वाने मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याच अजित पवारांच्या पक्षाचे काम करण्याची जबाबदारी आमच्या नशिबी नको, अशी स्पष्ट भूमिका घेत संघ शिस्तीतल्या कार्यकर्त्यांनी शांत राहणे पसंत केले होते. त्याचा परिणाम (Lok Sabha Elections) लोकसभा निवडणुकीत दिसून आला.
त्यानंतर (Udgir Assembly Constituency) उदगीर विधानसभा मतदारसंघात भाजपाचा मोठा गट माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झाला आहे. तटस्थ राहिलेला गट व शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेला गट वगळता उरलेला भाजपा आता संजय बनसोडे यांच्यासोबत असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच उदगीरची जागा भाजपाने लढवावी, अशी भूमिका कार्यकर्त्यांची आहे. पक्षाने ही जागा न लढविण्यास त्याचा वेगळा विचार कार्यकर्ते करू शकतात, अशी चर्चा सध्या जोर गरज आहे. भाजपा व अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पडलेली दरी आता वाढत गेली आहे. या दरीतून मतभेदाचे लोंढे वाहत आहेत. आरटीओ कार्यालयाच्या उद्घाटनास पालकमंत्री न येण्याचे हेच प्रमुख कारण असल्याची चर्चाही आता उदगीरमध्ये होत आहे.
दरम्यान शुक्रवारच्या या कार्यक्रमास माजी आमदार गोविंद केंद्रे यांचे सुपुत्र राहुल केंद्रे व रामभाऊ तिरुपे हे नेते वगळता भाजपाचे इतर कोणीही प्रमुख नेते उपस्थित नसल्याने या मतभेदाच्या दरीवर शिक्कामोर्तबच झाले आहे.