उदगीरच्या आघाडीत मशालीच्या वातीला अन् पंजाच्या पातीला मिळेना ‘इंधन!’
– महादेव कुंभार
उदगीर (Udgir Assembly Election) : उदगीरच्या जिल्हा परिषद मैदानावर साहेबांनी येऊन रणसिंग फुंकले तरीही उदगीरमध्ये तुतारी फुंकणाऱ्यामध्ये अद्याप जोश भरल्याचे दिसून येत नाही. तुतारी फुंकणाऱ्याला सद्यस्थितीत भरलेल्या धापीमुळे उदगीरच्या आघाडीत मशालीच्या वातीला अन पंजाच्या पातीला इंधन मिळेनाशी झाली आहे. परिणामी सैनिकांमध्ये हताशपणा पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.
उदगीर विधानसभेच्या (Udgir Assembly Election) मैदानात महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान क्रीडामंत्री संजय बनसोडे मैदानात आहेत. अत्यंत ‘तगडा’ असलेल्या या उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी शरद पवारांनी आपल्या पक्षात भाजपच्या माजी आमदाराला घेत उदगीर विधानसभेच्या मैदानात उतरविले. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. असे असले तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अद्याप ‘संथ’गतीने पावले टाकत असल्याचे बोलले जात आहे. ही संथगती महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना व काँग्रेसच्या शिपायांना अद्याप भावली नाही. या संथगतीने काम होत असेल तर प्रचाराच्या मैदानातच न उतरलेले बरे, अशी भावना घेत अनेक कार्यकर्ते आपले घर सोडायला तयार नाहीत.
नेत्यांनी कितीही सांगितले तरी घरातून बाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये जाण्यासाठी लोकांना सोबत घेऊन फिरण्यासाठी व पक्षाची महाविकास आघाडीची भूमिका सांगण्यासाठी लागणारे इंधन कुठून मिळणार? हा खरा प्रश्न या मतदारसंघात निर्माण झाला आहे. त्यामुळे एकीकडे आर्थिकदृष्ट्या ‘सक्षम’ असलेला उमेदवार आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांपासून अधिकाधिक ‘अंतर’ ठेवणारा उमेदवार असे चित्र निर्माण झाले आहे. हे चित्र ‘विचित्र’ असून हा विचित्रपणा नेमकी कोणाची पाठ लावतो? याकडे उदगीरच नव्हे, तर संपूर्ण लातूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
‘एकीकडे तगडी यंत्रणा असली तरी माणसांची वानवा आहे, तर दुसरीकडे माणसे आहेत; पण यंत्रणाच नाही!’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात ‘इकड’ची मंडळी ‘तिकडे’ गेली तर नवल वाटू नयेच अशी सध्याची स्थिती आहे.