तिवटग्याळ पाटी येथे शेतकरी संघटनेचे तासभर आंदोलन!
उदगीर (Udgir) : नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाल्याशिवाय सरकारची सोयाबीन (Soybean) खरेदी केंद्रे बंद करु नये, अशी मागणी करीत सोयाबीन खरेदीस मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी दि. 29 सकाळी 11 वाजता उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे तासभर रास्ता रोको करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा…
नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करु नये, खरेदीला मुदतवाढ द्यावी; अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. काल वजन काटे बंद केल्यानंतर राज्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची (Farmers’ Movement) दखल घेत सरकारने फक्त 20 हजार मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट वाढविले आहे. त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होऊ शकत नाही. त्याकरीता उद्दिष्ट व मुदत दोन्ही वाढवून द्यावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
उदगीर लातूर रोडवर तिवटग्याळ पाटी येथे तासभर हे आंदोलन चालले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. तहसील प्रशासनाने (Tehsil Administration) निवेदन स्विकारुन शासनाकडे मुदतवाढ करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष कल्याणाप्पा हुरदळे, शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष कालिदास भंडे, उदगीर तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील, युवा तालुकाध्यक्ष नितेश झांबरे, शिवाजी पाटील आदिंसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
2013 च्या दिंडीची दिली आठवण…
2013 साली विरोधीपक्ष नेते असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पाशा पटेल यांच्या शेतकरी दिंडीत येऊन सोयाबीनला 6000 रु. प्रति क्विंटल भाव मागितला होता. आता ते स्वतः भाव देणारे आहेत. शेजारील मध्यप्रदेश राज्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा 1000 रुपये वाढवून दिले आहेत. महाराष्ट्रात आता देवेंद्र फडणवीस हेच भाव देणारे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.