नागपूर (MBBS syllabus) : केंद्र शासनाने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या ‘रेस्पिरेटरी मेडिसिन’, ‘फिजिकल मेडिसिन अॅण्ड रिहॅबिलिटेशन’ व ‘इमर्जन्सी मेडिसिन’ या तीन विषयांचे विभाग रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने सुमारे महिनाभरापूर्वी केंद्राला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने उत्तर दिले नाही व मुदत वाढवूनही मागितली नाही. त्यामुळे, न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत आता उत्तर न दिल्यास विरोधात निर्णय देऊ, अशा शब्दात केंद्राला अंतिम संधी दिली. (MBBS syllabus) इंडियन चेस्ट सोसायटी व इंडियन असोसिएशन ऑफ फिजिकल मेडिसीन अॅण्ड रिहॅबिलिटेशन यांच्यावतीने ही जनहित याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली.
पूर्वीच्या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानुसार, (MBBS syllabus) एमबीबीएस अभ्यासक्रमाकरिता हे तिन्ही विभाग बंधनकारक होते. ८ ऑगस्ट २०१९ पासून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या जागेवर नॅशनल मेडिकल कमिशन कार्यान्वित झाले. कमिशनने १६ ऑगस्ट २०२३ रोजी नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करून संबंधित तीन विभागांना आवश्यक विभागाच्या यादीतून वगळले. हा निर्णय मनमानी, घटनाबाह्य व अन्यायकारक आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला असून हा निर्णय रद्द करण्याची विनंती याचिकाकत्यनि न्यायालयाला केली आहे.