मानोरा (Umaid employees Andolan) : सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी उमेद (Umaid employees Andolan) अंतर्गत काम करणाऱ्या महिला व कर्मचाऱ्यांचे चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी पत्र दिल्यामुळे शुक्रवारी स्थगित करण्यात आले. आश्वासन पूर्ण केले नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शिर्के यांनी दिला.
पावसाळी अधिवेशनात मुंबईत भर पावसात सुरू असलेल्या (Umaid employees Andolan) धरणे आंदोलनात सहभागी झालेल्यापैकी विविध जिल्ह्यांतील पंचवीस ते तीस आंदोलकांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. उमेद अंतर्गत काम करणाऱ्या महिला व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसह महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास विभागाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्यावी, प्रभाग संघ स्तरावरील कर्मचारी यांचे देखील कॅडर प्रमाणे मानधन वाढ करावी, वर्धिनींना पूर्णवेळ काम द्यावे, प्रवास खर्च मिळावा आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते.
बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची दखल घेऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले. परंतु मार्ग न निघाल्याने गुरुवारपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली. सायंकाळी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपल्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक असून त्यावर चर्चा करून तोडगा काढण्याासाठी पुरेसा वेळ द्यावा, असे संघटनेला पत्र दिले आहे. त्यावर रात्री उशिरापर्यंत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या (Umaid employees Andolan) आंदोलनात मानोरा तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातून ६ तालुक्यातून कर्मचारी व सी. आर. पी असे एकूण ३०० च्या वर महिलांनी सहभाग नोंदवीला होता.