बाजार समिती प्रशासनात खळबळ
देशोन्नती वृत्तसंकलन
तुमसर (Tumsar) :- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीची निवडणूक येत्या १२ मे रोजी होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली होती. परंतु बारा वर्षांपूर्वी आधारभूत धान खरेदी केंद्र गाव निहाय जोडनी प्रकरणाबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (Investigation Division) व राज्य शासनाच्या पणन विभागाने लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश तुमसर बाजार समितीला दिले आहेत. यामुळे बाजार समिती प्रशासनात एकच खळबळ माजली असून सदर बाब अत्यंत गोपनीय ठेवून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व पणन विभागाला याबाबत दोन दिवसापूर्वी माहिती सादर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्र गाव निहाय जोडणीचे प्रकरण
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत(Bombay Agricultural Produce Market Committee) आर्थिक अनिमिततेचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. तुमसर बाजार समितीची निवडणूक लागल्यानंतर बारा वर्षापूर्वीचे भूत येथे मानगुटीवर बसायला सुरुवात झाल्याचे दिसून येते. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समीतीने सन २०११-२०१२ या वर्षी शेअर्स जमा करण्याच्या दृष्टीने बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील तुमसर मोहाडी तालुक्यात चार धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी करण्यात आली होती.
सिआयडी व राज्य पणण अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली
सदर चार संस्थाना धान खरेदी करण्याचे बाजार समीतीने सन २०११-१२ या वर्षी टोकन पावती देवुन धान खरेदी केंद्र सुरू केले होते. सदर धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून बाजार समीती शेअर्स जमा करीत होती. संबंधित धान खरेदी केंद्रावर बाजार समीती मधील क़ंत्राटी कर्मचाऱ्याची नेमणुक करण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून टोकन व पावती दिली जात होती. यातील संबधीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बयाण सुध्दा सिआयडी व राज्य पणण अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर
सन २०११-१२ या वर्षी बाजार समीतीने सुरु केलेल्या धान खरेदी केंद्र संबंधी माहीती, टोकन पावती, कागदपत्राची छाननी, प्रत्यक्षांत धान खरेदी केंद्र अंतर्गत जोडण्यात आलेले गावांची माहीती, कर्मचारी, ग्रेडर,
या विषयी प्रत्यक्ष माहीती जाणुण घेण्याकरीता सिआयडी अधिकारी गेल्या आठवडाभरा पुर्वी
बाजार समीती मध्ये दाखल झाले होते.
निवडणुकीच्या तोंडावर बाजार समितीच्या प्रशासनात खळबळ उडाली
त्यानी संबंधित प्रकरणा विषयी कागदपत्रांची फाईल आपल्या ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाजार समितीच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे. तर येथिल तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. पूर्व विदर्भात तसेच राज्यात धान व तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १२ मे रोजी होत आहे. याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून असून विधानसभेची ती सेमी फायनल मानली जात आहे.
दरवर्षी कोट्यावधींच्या नफा या बाजार समितीला होतो त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाजार समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर बारा वर्षापूर्वी आधारभूत धान खरेदी केंद्राला गाव जोडनी कशी करण्यात आली याची सविस्तर माहिती राज्य सीआयडी (CID) व राज्य शासनाच्या पणन महासंघाने मागितली आहे. यात अनियमितता झाल्याचे राज्य सीआयडी व पणन महासंघाला शंका येत असल्याचे समजते.
राज्य सीआयडी विभाग व पणन महासंघाला तुमसर बाजार समिती प्रशासनाने बारा वर्षांपूर्वी आधारभूत धान खरेदी केंद्राला गाव जोडणी बाबत लेखी उत्तर दोन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु या प्रकरणामुळे बाजार समिती प्रशासनात एकच खळबळ माजली असून त्याच्या परिणाम बारा मे रोजी होणाऱ्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन वर्षापासून या बाजार समितीवर प्रशासक राज होते. या काळात राज्य शासनाच्या दोन्ही प्रशासकीय विभागाने विचारणा का केली नाही किंवा उत्तर का मागितले नाही असा प्रश्न उपस्थित होतो.
निवडणुकीवर परिणाम:
बारा वर्षांपूर्वीच्या आधारभूत धान खरेदी केंद्र गाव जोडनी प्रकरणाची गंभीर दखल राज्य सीआयडी विभाग व पणन महासंघाने घेतली आहे. त्याच्या परिणाम तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारा वर्षांपूर्वी गाव जोडनी प्रकरणात अनियमितता झाली आहे काय या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे व दस्ताऐवज दोन्ही विभागाने मागितले असल्याची माहिती असून तसे लेखी उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही प्रशासकीय विभागाच्या पत्रानंतर तुमसर व मोहाडी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तब्बल बारा वर्षानंतर जुने प्रकरण उकरून काढण्यामागील नेमके कारण काय असा प्रश्न दोन्ही तालुक्यातील सर्व सामान्य लोका बरोबरच राजकीय नेत्यांनाही पडला आहे. येथे दबाव तंत्राचा तर वापर करण्यात येत नाही अशी शंका उपस्थित होत आहे. बाजार समिती आपल्या हातात राहावी याकरिता महाविकास आघाडी व महायुती येथे प्रयत्नशील आहे जरी ही निवडणूक बाजार समितीची असली तरी भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondia) जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. राज्य सीआयडी व पणन महासंघ येथे बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वी संबंधित प्रकरणात कारवाई करते काय याकडे लक्ष लागून आहे.