गोंदिया (Gondia):- शहरात मागील ८ दिवसांपासून अघोषित पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मजिप्राच्या वतीने करण्यात येणार्या पाणी पुरवठ्यात खंड पडल्याने शहरात हाहाकार सुरू झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे.
महावितरण कारभाराने गोंदियाकरांची कोंडी
मजिप्राने क्षतिग्रस्त पाईपलाईनचे(Pipeline) काम सुरळीत केले तर आता महावितरणने ग्रहण लावल्याने पाणी पुरवठा(Water supply) सुरळीत होण्यास व्यत्यय निर्माण होत आहे. हा प्रकार १८ जूनपासून सुरू आहे. पण एकही जनप्रतिनिधी समस्यांची दखल घेताना दिसून आले नाही. गोंदिया शहराला डांगोर्ली येथे वैनगंगा नदीच्या (Wainganga River) पात्रात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. शहरात मजिप्राचे घरगुती, वाणिज्यीक, संस्था व नगर परिषद (City council) असे जवळपास २५ हजाराहून अधिक नळ कनेक्शन धारक ग्राहक आहेत. या ग्राहकांना एकवेळ पाणी पुरवठा केला जातो. परंतु, १८ जून रोजी पांढराबोडी गावशिवारात गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम करीत असताना पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली. याची माहिती मिळताच मजिप्राच्या अधिकार्यांनी पाणी पुरवठा बंद करून पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू केले.
शहरात पाणीटंचाई निर्माण होवून पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू
यामुळे तीन दिवस पाणी पुरवठा खंडीत (fragmented) राहिला होता. यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण होवून पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू होती. त्यातच मजिप्राच्या वतीने पाईपलाईन दुरूस्त करण्यात आल्याने २१ जून रोजी पाणी पुरवठा सुरळीत झाला. त्यातच महावितरणचे विघ्न निर्माण झाले. शुक्रवारी रात्रीपासून पाणी पुरवठा योजनेच्या हिवरा-दासगाव फिडरमध्ये बिघाड आल्याने पाणी पुरवठा बंद पडला. या पाणी टाक्यांमध्ये दिवसातून दोन वेळा पंप सुरू करून पाणी साठविले जाते. टाक्या भरण्यासाठी पंप पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी विशिष्ट दाबाने विद्युत पुरवठा (Power supply) होणे गरजेचे आहे. अन्यथा पाणी टाकी भरण्यास अडचण होत असते. त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. २१ जूनपासून सुरू असलेला तांत्रिक बिघाड (Technical failure) पूर्णपणे दुरूस्त न झाल्याने पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडितच होता. त्यामुळे पाणी टाक्यांमध्ये पाणी भरण्यात आले नाही. परिणामी आज (ता.२५) पर्यंत अर्ध्याहून अधिक शहराला पाणी टंचाईची झळ सोसावी लागली. आज, २५ जून सायंकाळी पाणी पुरवठा योजनेतील तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला असून डांर्गोली येथून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचे मजिप्राच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यातील व्यत्यय दूर होणार, असे वर्तविले जात आहेत.
अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा
गोंदिया शहरात अचानक पाणीटंचाईने निर्माण झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. नागरिक पाण्यासाठी इतरत्र साधनांचा शोध घेऊ लागले. परंतु, वॉर्डावॉर्डात असलेले नगर परिषदेने बोअरवेल बंद असल्याने समस्येत भर पडली. यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यातच दोन-तीन दिवसांपासून नळांना अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने शास्त्री वॉर्ड, गांधी वॉर्डसह अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आले. येथील सामाजिक कार्यकर्ता आशिष ठकरानी, बबलु रहांगडाले यांनी नगर परिषदेशी संपर्क साधून टँकर उपलब्ध करून दिला होता.