पोहरा (Woman Death) : लाखनी तालुक्यातील कणेरी/दगडी येथे कुलरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून पूजा प्रदीप सूर्यवंशी (३६) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पूजा सूर्यवंशी सकाळी त्यांच्या घरातील कुलरवर ठेवलेला रांगोळीचा डब्बा घेण्यासाठी कुलरजवळ गेल्या होत्या. त्याचवेळी कुलरजवळ असलेल्या विद्युत मीटरमधून कुलरमध्ये (Woman Death) विजेचा प्रवाह उतरला. रांगोळीचा डब्बा घेण्यासाठी कुलरला स्पर्श करताच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याने त्या पुन्हा कुलरवरच कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या शरीराचा काही भाग भाजला.
कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पूजा यांच्या पश्चात त्यांचे पती प्रदीप सूर्यवंशी आणि एक पाच वर्षांचा मुलगा आहे व सासू सासरे आहेत. या (Woman Death) दुर्दैवी घटनेमुळे लहानग्या मुलाच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं आहे. या घटनेमुळे कणेरी/दगडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पूजा यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विजेच्या उपकरणांची योग्य काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, हे या (Woman Death) घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे.
