हिंगोली (Hingoli Suicide Case) : शहरातील लालालजपतराय नगर भागातील कमानीजवळ एका झुडूपात ३० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत शनिवारी उघडकीस आला. हिंगोली शहर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, गणेश लेकुळे, गणाजी पोटे, गणेश वाबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह खाली उतरविण्यात आला. त्याची ओळख पटली नाही. जवळपास दोन ते तीन दिवसापूर्वी गळफास घेतला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी पोलिसांना काही जमा केलेल्या पिशव्या आढळल्या. त्यावरून ही अनोळखी व्यक्ती भिक्षेकरी असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. घटनेप्रकरणी हिंगोली शहर पोलिसात सायंकाळी उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.