अर्थ मंत्रालयाने या योजनेला दिली मंजुरी!
Union Budget 2025 : भारत सरकार आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये 25,000 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक घटकांसाठी नवीन उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजना (PLI योजना) जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या योजनेचा उद्देश देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि विशेषतः चीनवरील (China) अवलंबित्व कमी करणे हा आहे. अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होऊ शकते. यामुळे चीनचेही मोठे नुकसान होणार आहे.
MeitY करणार लवकरच घोषणा…
ही योजना मुद्रित सर्किट बोर्ड (PCB) सब-असेंबली, बॅटरी, डिस्प्ले आणि कॅमेरा मॉड्यूल यासारख्या प्रमुख इलेक्ट्रॉनिक घटकांच्या देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देईल. अधिकृत घोषणेपूर्वी इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) कॅबिनेटची मंजुरी घेऊ शकते.
सरकारचे लक्ष्य काय?
PLI ही योजना भारतातील इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन वाढवण्याच्या सरकारच्या योजनेचा एक भाग आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन वाढवणे आणि परदेशातून होणारी आयात कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
भारतात वाढेल इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन…
या योजनेमुळे भारतात (India) इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल, असे उद्योग तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या सहा वर्षांत, भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन दुप्पट होऊन $115 अब्ज झाले आहे. या योजनेतून $50-60 बिलियन किमतीचे इलेक्ट्रॉनिक घटक तयार होण्याची अपेक्षा आहे. यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात जगातील मोठा खेळाडू बनू शकेल.