जुन्यांची आठवण नव्यांचा विसर
भाजपचे स्थानिक पदाधिकारी अनभिज्ञ
आ. वसंतजी खंडेलवाल यांच्या निवासस्थानी होता मुक्काम
अकोला: केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची अचानक अकोल्यात भेट दिली.भाजपचे स्थानिक पदाधिकारी मात्र या भेटीबाबत अनभिज्ञ होते. आ. वसंतजी खंडेलवाल यांच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम होता. खंडेलवाल परिवाराने गडकरी परिवाराचा उत्तम पाहुणचार केला. यावेळी गडकरींनी जुन्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतले व त्यांची आस्थेने चौकशी केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब रविवारी संतनगरी शेगाव येथे श्रींच्या दर्शनासाठी आले होते, असे सांगण्यात आले आहे. दर्शन आटोपल्यानंतर ते आपल्या परिवारासह अकोल्यात आले. त्यांनी आमदार वसंतजी खंडेलवाल यांच्या निवासस्थानी सहपरिवार भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी सौ. कांचनताई गडकरी, मुलगा,मुलगी, सून, व्याही, नातवंडे असा संपूर्ण परिवार सोबत होता. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार वसंतजी खंडेलवाल यांचे वडील मदनलालजी खंडेलवाल यांची ना. गडकरी यांनी आस्थापूर्वक चौकशी केली. अकोल्यातील भाजपचे जेष्ठ पदाधिकारी पंडितराव कुलकर्णी, बंडूभाऊ पंचभाई, सिद्धार्थजी शर्मा यांच्यासह जुन्या जाणत्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची यावेळी त्यांनी खास आठवण काढली. पंडितरावांना आमदार खंडेलवाल यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले व त्यांची ख्यालखुशाली त्यांनी विचारली.
केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांचा आजचा दौरा हा रस्ते मार्गानेच झाला. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील रस्ते व उड्डाणपूल यांच्या कामाविषयी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. धावत्या व गुप्त दौऱ्यात जुन्या कार्यकर्त्यांची गडकरींनी आठवण काढली, मात्र ते नवे नेते यांना कसे काय विसरले असा प्रश्न मात्र उपस्थित करून गेले.