चंद्रपूर (Chandrapur) :- मे महिना म्हटला की, कडक उन्हाळा आणि उन्हाच्या झळा सर्वांनाच सहन कराव्या लागत असतात मात्र यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात मे महिन्याच्या प्रारंभापासूनच अधून मधून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावणे सुरू केले. काही दिवसांच्या उकाड्यानंतर बुधवार (दि.२१ मे ) ला दुपारनंतर मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली तर आज गुरूवारी (दि.२२मे ) दुपारी १२ वाजतापासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून ऐन भर उन्हाळ्यात नागरिकांना पावसाची फिलींग अनुभवायला मिळत आहे.
वादळी पावसाने अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने अंधारात रात्र काढावी लागली
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी या तालुक्यात उन्हाळी धान पिकाचे मोठे नुकसान झाले. काल सायंकाळी आलेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर वादळी पावसाने अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने अंधारात रात्र काढावी लागली. आजही सांयकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच असल्याने वीजेचा लपंडाव सुरूच होता. पाऊस येत असला तरी नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे शहरात काही मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना छत्र्या व रेनकोट बाहेर काढण्याची पाळी आली.




