गडचिरोली (Gadchiroli) :- गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) कहर सुरूच असून अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळल्याने धानोरा तालुक्यातील खरगी येथील १० जनावरे व कोरची तालुक्यातील कामेली गावातील एक जनावर ठार झाल्याची घटना काल १७ मे रोजी घडली.
दोन ठिकाणी वीजा कोसळल्या – ११ जनावरे ठार
धानोरा तालुक्याला शुक्रवारी वादळी वार्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. खरगी हे गाव पयडी परिसरात आहे. गावाजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाखाली जनावरे बसली होती. रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक आंब्याच्या झाडावर वीज कोसळली. यात १० जनावरे ठार झाली. दुसर्या घटनेत कोरची तालुक्यातील अतिदुर्गम कामेली येथे १६ मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या पावसादरम्यान वीज कोसळली. यात आसाराम रूपजाळे यांचा एक बैल जागीच ठार झाला. यात पशुपालकाचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. हवामान विभागाने (Department of Meteorology) दिलेल्या इशार्यानुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास धानोरा तालुक्यातील काही भागांत अवकाळी सरी बरसल्या. धानोरा-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील पांढरसडा ते गिरोला मार्गावर झाड कोसळले. सिरोंचा, गडचिरोली व अन्य तालुक्यातही अवकाळी पाऊस आला होता.




