संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्याची शेतकरी संघटनेची मागणी
लातूर (Urea fertilizer) : युरिया खतासोबत लिंकिंग च्या नावाखाली कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून युरिया सोबत लिक्विड नॕनो युरिया तसेच ह्युमिक ऍसिड व इतर शेती उपयोगी रसायने घेतली, तरच युरिया मिळेल, अशी अट विक्रेत्यांकडून घातली जात आहे. दरम्यान याप्रकरणी तात्काळ चौकशी करून संबंधित विक्रेत्या विरोधात योग्य ती कारवाई करावी; अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके व कार्याध्यक्ष बालाजी जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांकडे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबत मंगळवारी लेखी तक्रार केली. रबी हंगामात अनेक शेतकरी (Urea fertilizer) युरिया खरेदीसाठी मार्केटमध्ये येत आहेत. रबीसह उसालाही युरियाची आवश्यकता आहे. मात्र मार्केटमध्ये कृषी निविष्ठाधारक विक्रेते युरिया देण्यास नकार देत आहेत. युरिया पाहिजे असेल तर त्यासोबत नॕनो युरिया, नॅनो डीएपी, ह्युमिक ॲसिड किंवा इतर रसायने घ्यावी, अशी अट शेतकऱ्यांसमोर ठेवत आहेत.
इतर वस्तू घेतल्या तरच युरिया (Urea fertilizer) दिला जाईल’ असे सांगून शेतकऱ्यांचे अडवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांची होणारी ही अडवणूक थांबवावी तसेच आढळून करणाऱ्या संबंधित विक्रेत्यांविरोधात योग्य ती कारवाई तात्काळ करावी, अशी मागणी शंके व जाधव यांनी केली आहे. या मागणीचा तात्काळ विचार करावा; अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही या निवेदनात दिला आहे.