वाहतूक करणे कठीण : प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष!
हसन मोमीन
वलांडी (Valandi Parking) : देवणी तालुक्यातील वलांडी येथे बाजारपेठेसह निलंगा उदगीर राज्य मार्गावरील वाहनांच्या बेशिस्त पार्किंग केल्या जात असल्याने या मार्गावरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.
वलांडीत बेशिस्तीत (Valandi Parking) वाहने उभा करायची स्पर्धा लागली की काय ? अशी चर्चा सध्या बाजारपेठेत होत आहे. याविरुध्द ओरड करुनही मस्तवाल वाहनधारकांवर कारवाई करण्याची ‘डेअरींग’ अद्याप कुणीही दाखवली नाही. म्हणुन बाजार पेठेत व राज्य मार्ग उदगीर – निलंगा जाणाऱ्या रोडवर लहान मोठी वाहने शेकडोच्या संख्येत वेडीवाकडी बेशिस्तीत थांबलेली दिसतात. परंतु संबंधित प्रशासनाला दिसत कसे नाही? तसेच अशा वाहनांवर दंड व कारवाई करण्याचा आदेश व नियम हा फक्त शहरी भागासाठीच आहे का? वलांडी सारख्या ग्रामीण भागासाठी नाही का ? तसेच एखादा अपघात होऊन त्यात २-४ व्यक्ती मरण पावल्यावर या वाहनांवर संबंधित यंत्रणा कारवाई करणार आहे का ? असे प्रश्न त्रस्त जनता व व्यापारी यांच्याकडून विचारला जात आहे.
वलांडी (Valandi Parking) हे बाजार पेठेचे व कर्नाटक सिमेलगतचे गाव असल्यामुळे ४०- ५० गावातील हजारो जनतेची व लहान-मोठ्या वाहनांची या ठिकाणी सतत ये-जा असते. मात्र पार्किंगची सोय नसल्याने स्टॉपवर एसटी थांबण्यासाठी पण जागा राहत नाही. बेशिस्तीत उभा गाड्यांमुळे रोड जाम पार्किंगची सोय नसल्याने शेकडो लहान-मोठी वाहने कुठेही वेडी-वाकडी थांबलेली दिसतात. आणि यामुळे एसटी बस मेन स्टॉपवर थांबायला ही जागा राहत नाही. यामुळे दुर अंतरावर एसटी बसेस उभा करतात. तसेच बेशिस्तीत उभा केलेल्या गाड्यांमुळे सतत रोड जाम होत असतो.
शेकडो लहान-मोठी वाहने कुठेही वेडी-वाकडी थांबलेली दिसतात. म्हणुन या विरुध्द वृत्त पत्राद्वारे आवाज उठविला तरीही या गंभीर बाबीकडे आजवर गांभीर्याने कोणत्याच अधिकाऱ्याने लक्ष का घातले नाही. हे एक न उलगडणारे कोडेच अनेकांना पडले आहे. आठवडी बाजारादिवशी तर गावातील एखादी व्यक्ती मरण पावली तर अंत्यविधी घेउन जाण्यासाठी खूपच हलाखीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडी बाजारा दिवशी मोबाईल चोरीच्या घटना महिलांना त्रास आदींच्या छोट्या मोठ्या घटना घडत असतात. पोलीस प्रशासनास विनंती करुनही पोलीस प्रशासन या कडे जाणुन बूझून डोळेझाक करीत आहे की काय? असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.
कठोर पायबंद घालावा…
बाजारपेठेत एखादा अपघात व्हावा आणि मगच याबाबत पावले टाकावीत, अशी मनोकामना संबंधित यंत्रणेची तर नाही ना? संबंधित अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष घालून बाजारपेठेत व राज्य मार्गावरती होणारी बेशिस्त पार्किंगवर लक्ष वेधण्याची गरज आहे. भविष्यात होणारे आपात्कालीन धोके टाळण्यासाठी कठोर पायबंद पोलीस प्रशासनाने घालावा, अशी वलांडीतील नागरीकांची मागणी आहे.