परभणी (Parbhani crops) : केंद्रीय बियाणे अधिनियम नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारशी वरुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणांचा समावेश भारताच्या राजपत्रात केला आहे. याबाबत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिसूचना प्रसिध्द केली आहे. या पाच वाणात विद्यापीठ विकसीत हरभर्याचा परभणी चना – १६, सोयाबीनचा एम.ए.यु.एस. – ७३१, देशी कापसाचा पी.ए. ८३३, अमेरिकन कापसाचा एन.एच. ६७७ आणि तिळाचा टि.एल.टी. – १० या वाणांचा समावेश आहे.
या वाणातील हरभरा, अमेरिकन कापूस आणि तिळाच्या वाणास महाराष्ट्र राज्याकरीता लागवडीसाठी प्रसारण करण्याची मान्यता देण्यात आली आहे. तर सोयाबीनच्या वानास महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्रासाठी लागवडीकरीता मान्यता देण्यात आली आहे. देशी कापसाच्या वाणास दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्याकरीता लागवडीस मान्यता प्राप्त झाली आहे. देशाच्या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पीक वाणांच्या समावेशामुळे सदरील वाणांचे बिजोत्पादन हे मुख्य बिजोत्पादन साखळी मध्ये घेता येणार आहे. या वाणांच्या विकासासाठी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. खिजर बेग, डॉ.व्ही.एन. चिंचाणे, डॉ. डि.के. पाटील, डॉ.एस.पी. मेहत्रे, डॉ.व्ही.के. गीते, डॉ. मोहन धुप्पे आदींचे अभिनंदन करण्यात आले आहे.
वाणांचा प्रसार व प्रचार होऊन शेतकर्यांची आर्थिक उन्नती साधता येईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी केले.
शेतकर्यांना होणार लाभ
देशाच्या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पीक वाणांचा समावेश केल्यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे. त्याच प्रमाणे शेतकर्यांची आर्थिक उन्नती साधता येईल असे प्रतिपादन वनामकृवीचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी केले.
वाणांची थोडक्यात माहिती
हरभर्याचा परभणी – १६ हा वाण सरासरी पेक्षा अधिक उत्पादन देणारा आहे. ११० ते ११५ दिवसात परिपक्व होतो. मर रोगास प्रतिबंधक आहे. या वाणावर किडीचा प्रादूर्भाव कमी होतो. सोयाबीनच्या एमएयुएस – ७३१ हा वाण ९४ ते ९८ दिवसात परिपक्तव होतो. शेंगांचे प्रमाण अधिक असतात. कोरडवाहूसाठी अधिक उत्पादन देणारा किड व रोगास प्रतिकारक असलेला वाण आहे. प्रति हेक्टरी २८ ते ३२ क्विंटल उत्पादन येते. कपाशीचा पीए ८३३ वाण हेक्टरी १५ ते १६ क्विंटल उत्पादन देते. सरळ धाग्याची लांबी व मजबुती अधिक आहे. रोगास प्रतिकारक वाण आहे. अमेरिकन कपाशीच्या एनएच ६७७ हा वाण पाण्याच्या ताणास व रसशोषक किडीला सहनशील असून सधन पध्दतीने लागवडीस योग्य आहे. तिळाचा टिएलटी – १० हा वाण महाराष्ट्रासाठी लागवडी करीता शिफारस करण्यात आला आहे. हेक्टरी ६ ते ७ क्विंटल उतारा येतो. अळी व किडीला सहनशील वाण आहे.