माजी मंत्री वसंतराव पुरके यांचे प्रतिपादन
मानोरा (Vasantrao Naik) : आयुष्यात यशस्वी होण्याकरीता धडपड करीत असतांना अनेकदा गरीबीमुळे अडचण तसेच सौदर्यामुळे न्युनगंड येतो. मात्र गुणवत्ता जवळ असेल तर या अडचणीवर सहज मात करता येते. त्यामुळे तरुणांनी गुणवत्ता बाळगून जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके (Vasantrao Purke) यांनी केले. ते देवानंद पवार यांच्या पु्ढाकाराने हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या जयंती पर्वावर मानोरा येथील ठाकरे पॅलेस वर दि. २ जुलै रोजी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळयात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
मानोरा सारख्या दुर्लक्षीत भागात देवानंद पवार यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्याकरीता तसेच त्यांच्या मनातील न्युनगंड बाहेर काढण्याकरीता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करीअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला, ही कौतुकास्पद बाब आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन ही काळाची गरज आहे असेही पुरके म्हणाले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
मानोरा तालुका हा शैक्षणिक, औद्योगिक व आरोग्याच्या दृष्टीने अतिशय मागासलेला आहे. याठिकाणी चांगल्या शाळा व महाविद्यालयांची कमतरता आहे. मोठे दवाखाने नाही त्यामुळे नागरीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच या तालुक्यात एकही शासकीय वसतीगृह नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी कुचंबना होत आहे. संत सेवालाल महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली ही भूमी विकासापासून मात्र कोसो दूर आहे. शाळा, कॉलेज, वसतीगृह व आरोग्यांच्या सुविधा मिळविण्यासाठी पुढील काळात लढा उभारण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस, वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितांना पालकांनी त्यांच्यावर आपले मत लादु नये. पप्रत्येकाला कौशल्याच्या आधारावर धडपडू द्या. त्याची काठी बनून त्यांना कमकुवत व अपंग करु नका. त्यांच्या मनगटीत ताकद द्या. आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांना त्यांचे क्षेत्र निवडू द्या, असे आवाहन करीअर मार्गदर्शनाच्या संदर्भात बोलतांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते प्रा. सचिन बुरघाटे यांनी व्यक्त केले.
आपले करिअर घडवित असतांना अनेकदा विद्यार्थी मार्गदर्शनाच्या अभावामुळे दीशाहीन झालेले असतात. दिशा चुकली तर आयुष्याचे नुकसान होते. त्यामुळे विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणा-या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पवार यांचे राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी केले आणि अशा कार्यक्रमांच्या आयोजनात सातत्य ठेवण्याचेही आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रा. वसंतराव पुरके (Vasantrao Purke) , करिअर मार्गदर्शक प्रा. सचिन बुरघाटे, माजी आ. अनंतकुमार पाटील, प्रेमसिंग नाईक महाराज, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार चे शहराध्यक्ष हाजी रऊफ खान, जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार पटेल, गजानन राठोड, संजय भानावत, डॉ. अशोक करसडे, रामनाथ राठोड, डॉ. निरंजन खुपसे आदीसह इतरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता तालुका अध्यक्ष अमोल तरोडकर, पदाधिकारी डॉ सौ. नंदाताई तायडे, महेश जाधव आदींनी अथक परिश्रम घेतले.