हिंगोली (Vasmat Assembly Election) : वसमत विधानसभा मतदार संघात सुरूवातीला थेट लढत होईल, असे चित्र असतांना जन सुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गुरू पादेश्वर शिवाचार्य महाराज उर्फ बापू यांच्यामुळे निवडणुकीचे चित्र पालटले आहे. शेवटच्या टप्यात येत असतांना वसमतची निवडणुक तिरंगी झाली आहे.
सुरूवातीला वसमत विधानसभेत राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होईल असे जाणवत होते. (Vasmat Assembly Election) विद्यमान आमदार व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले राजू पाटील नवघरे यांची त्यांचे राजकीय गुरू माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी थेट लढत होईल असा अंदाज होता. अशात राजकीय पटलावर गिरगाव येथील वीर मठ संस्थानचे महंत गुरू पादेश्वर महाराज यांची दमदार एन्ट्री झाली. कट्टर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असलेल्या गुरू पादेश्वर यांना मतदार संघातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मतदार स्वत:च निधी गोळा करून महाराजांना भेट म्हणून देत असल्याने त्यांची लोकप्रियता हिंदु मतदारांत मोठी असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीपासुन (Vasmat Assembly Election) वसमत विधानसभा मतदार संघात ‘डिएमएम’ फॅक्टर सुरू आहे. दलित, मुस्लिम व मराठा या तीन समाजांच्या मतांच धृवीकरण लोकसभा निवडणुकीत पहावयास मिळाले होते. कमी अधिक प्रमाणात हेच सूत्र विधानसभा निवडणुकीतही कायम राहील असा अंदाज आहे. दुसरीकडे महायुतीला मिळणारे परंपरांगत हिंदुत्ववादी मतदान या वेळेला मिळविणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कठीण बनले आहे. सत्तेतील नंतरच्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी मतदार संघात आणलेल्या निधीची मोठी यादी त्यांच्या हातात आहे. तरीही मतदार मात्र वसमत शहराच्या बकाल अवस्थेकडे बोट दाखवून विकास कुठे आहे, असा प्रश्न करीत आहेत. एकंदरीत गुरू पादेश्वर महाराजांच्या एन्ट्रीमुळे वसमतची निवडणुक अत्यंत चुरशीची बनली आहे.
गुरू शिष्याच्या लढतीत ‘महागुरू’ ची एन्ट्री
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Vasmat Assembly Election) वसमत विधानसभा मतदार संघाने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता. त्यावेळी मविआच्या नागेश पाटील यांना ८४ हजार ६४६ तर महायुतीच्या बाबुराव कोहळीकर यांना ५४ हजार ९६ मते पडली होती. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत ३० हजार ५५० मतांची आघाडी मिळाली होती. त्यावेळी लोकसभेत तशी लढत थेट होती. काही वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. बी.डी. चव्हाण यांनी मविआचीच मते विभागली होती. या निवडणुकीत मात्र महायुतीच्या मतांमध्ये सरळ विभाजन दिसून येत आहे.