आंबा चोंडी/हिंगोली (Vasmat Murder Case) : वसमत तालुक्यातील आंबा येथे एका तरुणाचा चाकूनेे भोसकून खून झाल्याची घटना गुरुवारी १८ जुलै रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कुरुंदा पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. यामध्ये पोलिसांनी संशयीताचा शोध सुरु केला आहे. शेतीच्या वादातून हा प्रकार झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबा येथील सतीष सुरेश भोसले (२७) हे आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास गावालगत असलेल्या पुलावरून काही मित्रांसोबत जात होते. यावेळी एका तरुणाने अचानक तेथे येऊन सतीष यांच्या पोटात चाकूने वार केले. अचानक झालेल्या या हल्यामुळे सर्वच जण घाबरून गेले. तर चाकूने वार करणाऱ्या तरुणानेही घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकारीची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, उपनिरीक्षक चौधरी, जमादार बालाजी जोगदंड, सिद्दीकी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी सतीष यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथे नेत असतांनाच त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात रात्री उशीरा पर्यंत कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.
दरम्यान, मयत सतीष यांचा गावातील काही तरुणांसोबत वाद झाला होता या वादातून तसेच शेतीच्या वादातून त्याचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून एका संशयीताचा शोध सुरु असून त्यासाठी पथके रवाना केल्याचे पोलिसांनी सांगितले.