वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल करून निलंगा पोलिसांकडे केला वर्ग
हिंगोली (Vasmat Woman Abortion) : वसमत तालुक्यातील डोणवाडा येथील गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारल्यावर तिला गर्भपाताचे (Woman Abortion) खासगी औषध देऊन तिचा गर्भपात केल्याप्रकरणी वसमत शहर पोलिसात निलंगा येथील पतीवर गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डोणवाडा येथील यशोदाबाईचा विवाह लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील शंकर हिरास याच्यासोबत झाला होता. काही दिवस तिला चांगले वागविल्यावर शंकरने या न त्या कारणावरून त्रास देण्यास सुरूवात केली. त्यातच यशोदाबाई ही दोन महिन्याची गर्भवती असूनही तिला गर्भपात करण्याकरीता त्रास दिला होता. तिने गर्भपात करण्यास नकार दिल्यामुळे शंकरने १० ऑक्टोंबरला तिला मारहाण केली.
ज्यामध्ये तिच्या पोटातही लाथा मारल्या. त्यानंतर गर्भपातासाठी दुधामध्ये खासगी औषध देऊन पत्नीचा गर्भपात (Woman Abortion) केला. त्यानंतर यशोदाबाईला माहेरी वसमत तालुक्यातील डोणवाडा येथे आणून सोडले. तिची प्रकृती पाहून माहेरच्यानी वसमत उपजिल्हा रूग्णालयात तिला दाखल केले. याप्रकरणी यशोदाबाई हिरास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलिसात पती शंकर हिरास याच्यावर गुन्हा दाखल केला. हे प्रकरण निलंगा पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने सदरचा गुन्हा निलंगा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.