नागपूर (Nagpur):- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे (Nagpur University) माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे गुरुवारी (ता. २६) निधन झाले. मागील एक महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांना पांढरा पीलीया झाला होता. त्यानंतर पंडू रोगाने त्यांना ग्रासले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षाचे होते. अंत्ययात्रा आज २६ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता कुलगुरू निवास, विद्यापीठ परिसर नागपूर येथून निघेल. अंबाझरी घाट तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार(Funeral) करण्यात येतील.
यांच्यावर मागील काही महिन्यांपासून उपचार सुरु होते
डॉ. चौधरी यांच्यावर मागील काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील आठवड्यात रात्री प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबई येथे नेण्याचा निर्णय निकटवर्तीयांनी घेतला होता. त्यानुसार, ‘एअर अॅम्बुलन्स इंडिया’ या कंपनीशी संपर्क साधून एअर अॅम्ब्युलन्सची नोंदणी करण्यात आली. त्यासाठी सात लाख रुपयांचा भरणाही कंपनीकडे करण्यात आला. मात्र वेळेत एअर अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांच्यावर नागपूरातील खाजगी रुग्णालयातच उपचार सुरू होता, मात्र यात डॉक्टरांना यश न मिळाल्याने अखेर गुरुवारी पहाटे त्यांचे निधन झाले.
अल्पपरिचय:
डॉ. सुभाष चौधरी यांचा जन्म १८ मे १९६५ रोजी झाला. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली होती . अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक त्यांना अनुभव होता. ८ ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची धुरा सांभाळली.