गावकऱ्यांनी काढली डीजेवर मिरवणूक
मालेवाडा (Villager Police) : घरात अठराविश्वे दारिद्र असताना जिथे पोटाची भूक भागवण्याची सोय नाही तर शिक्षणासाठी कुठून खर्च करणार? अशा परिस्थितीत गोळ्या, बिस्किट, पिंगर विकून कसाबसा वडील संसाराचा गाडा चालवित होते. मात्र अशाही परिस्थितीत तब्बल सहा वर्ष किराणा दुकानात काम करून आकाश पोलिस (Villager Policeman) झाला अन गावकऱ्यांनी त्याची डिजेवर मिरवणूक काढली.
“पापा कहते है, बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा” या ‘कयामत से कयामत तक’ फिल्म मधील गीताला साजेशी बातमी भिवापूर तालुक्यातील मांडवा (सोमनाळा) या गावातील आहे. आकाश हरिभाऊ डाहारे(29 वर्ष) असे त्या तरुणाचे नाव. वडील हरिभाऊ सध्या 70 वर्षाचे झालेले आहेत. हरिभाऊ गावातच फिंगर, गोड्या, बिस्कीट विकायचे तर आई रोज मजुरी करून पोटाची खळगी भरण्याचे काम सुरू होते. आकाश बारावी परीक्षा पास झाल्यानंतर समोरचे शिक्षण कसे करायचे या विवंचनेत होता. त्याने किराणा दुकानात काम सुरू केले. त्यासोबतच (Police Bharti) पोलीस भरती करिता तयारी सुरू केली. तब्बल सहा वर्ष किराणा दुकानात आकाशचे काम सुरू होते.
अशातच नुकत्याच झालेल्या (Police Bharti) पोलीस भरतीमध्ये तो पास झाला. अन् त्याच्या आई-वडिला सोबतच गावकऱ्यांना आनंद गगनात मावेनासा झाला. आकाशचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी पोलीस पाटील शत्रुघन राऊत, शरद आगे , रवी मलवंडे, व गावातील इतर तरुणांनी त्याचा सत्कार केला. त्यानंतर एखाद्या राजकीय निवडणुकीत विजयी झाल्याप्रमाणे जिप्सीमध्ये बसवून डीजेवर अख्या गावभर मिरवणूक काढण्यात आली. या सत्कार सोहळ्याने आकाश गदगद झाला. मी आई-वडिलांसोबतच गावकऱ्यांचे ऋण विसरणार नाही. त्याकरिता गावातील इतर तरुणांना त्यांच्या भविष्याकरिता मार्गदर्शन करीन, अशी प्रतिक्रिया आकाशने दिली.