लातूर (Latur):- जगाच्या पोशिंद्याला आत्महत्येपासून वाचविण्यासाठी त्याला संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी आणि सोयाबीनला (soybeans) प्रतिक्विंटल 9 हजारांचा भाव मिळावा, यासाठी आता गावे सरसावली आहेत. सोयाबीनला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, असा ऐतिहासिक ठराव लातूर जिल्ह्यातील कवळी (ता. औसा) ग्रामसभेने केला आहे. हा ऐतिहासिक ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
सोयाबीनला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा
शेतकरी (Farmer)नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, अरुण दादा कुलकर्णी, अशोक दहिफळे, राजीव कसबे यांच्यासह राज्यभरातील असंख्य कार्यकर्ते सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे सरकारचे लक्ष वेधण्याचे आंदोलन करीत आहेत. तरी सुद्धा सत्तेच्या मस्तीतील सरकारला जाग येत नाही. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी जिजाऊमाँसाहेब यांच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून अन्नत्यागाचा संकल्प करीत निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्याचाच भाग म्हणून संपूर्ण राज्यात निवेदन देत सरकारचा अत्यंत तीव्र स्वरूपात निषध व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून कवळी ग्रामपंचायतमध्ये शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांनी शेतकरी शेतमजूर निराधार लोकांच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणली व ऐतिहासिक असा ठराव मंजूर केला आहे.
साखरेला 4000 रुपये प्रतीक्विंटल भाव
सोयाबीन ला 9000 रुपये प्रतीक्विंटल भाव मिळावा, सन 2023—2024 चा पीकविमा मिळावा, सतत चार पाच वर्ष शेतीमालाला भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, सन 2024–2025 अतिवृष्टी अनुदान व पीकविमा मिळावा, ठिबक तुषार सिंचन अनुदान तात्काळ मिळावे, कांद्यावरील निर्यात बंदी अट कायमस्वरूपी रद्द करावी,साखरेला 4000 रुपये प्रतीक्विंटल भाव मिळावा, ई पीक पाहणीची अट कायमस्वरूपी रद्द करावी अशा मागण्यांबाबत ग्रामसभेत चर्चा होऊन ठराव झाले व याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त
सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्या घामाची कवडीमोल किंमत झाली आहे. कर्जाचा प्रचंड डोंगर डोक्यावर आहे, बी बियाणे, खत कीटक नाशक, मशागत खर्च आधुनिक यांत्रिकीकरणामुळे आवाच्या सव्वा झालेला आहे त्यात कधी निसर्ग कोपतो तर सरकार शेतकऱ्याच्या विरोधातच असते त्यामुळे तो पुरता मेटाकुटीला आल्याने स्वतःची जीवन यात्रा संपवून घेतो. या नैराश्यातून त्याच्या माघारी त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येऊन संसाराची राख रांगोळी होते. अशी कितीतरी प्रश्न आहेत. परंतु सरकार लक्ष देत नाही, असा आरोप यावेळी ग्रामसभेत बोलताना राजेंद्र मोरे यांनी केला.