वाशिम (Washim Jain Samaj) : जिल्हयातील शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये (Jain Temple) सध्या वारंवार वाद निर्माण होत आहेत .श्वेतांबर समाजाला तेथील क्षेत्रपालजी मूर्तीचे पूजेचा कुठलाही अधिकार नसताना सदर मूर्तीकडे ते ताबा घेण्याच्या गैरहेतूने वाटचाल करीत आहेत. याठिकाणी श्वेतांबरी समाजाने ठेवलेल्या सेवकांकडून दिगंबरी भक्त आणि पुजार्यांवर वेळोवेळी हल्ले करुन त्यांच्यावर अतोनात अन्याय केला जात आहे. याबाबत कारवाई व्हावी, या मागणीकरिता शहरातील बालाजी मंदिराजवळील अहिंसा स्तंभ येथून मुल निवासी महाराष्ट्रीयन दिगंबर (Jain Samaj) जैन समाज बांधवातर्फे विराट मोर्चा (Virat Morcha) निघून शिष्टमंडळांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. या विशाल मोर्चामध्ये दिगंबर जैन मुनी ऐल्लकश्री सिद्धांतसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनात राज्यातील विविध जिल्हयातून आलेले १५ ते २० हजार दिगंबर जैन श्रावक सहभागी झाले होते.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन हे जैनाची काशी म्हणून ओळखले जाते. याठिकाणी दर्शनासाठी भारतातून नव्हे तर जगभरातून जैन तसेच इतर धर्मीयांची दर्शनासाठी गर्दी होत असते. परंतु, सद्या श्वेतांबर आणि दिगंबर (Jain Samaj) जैन समाजाच्या वादाने हे संस्थान चर्चेत आले आहे. येथील वाद दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे.
श्वेतांबर समाजाने प्रथम मुर्तीवर दावा दाखवला. त्यानंतर आता ते संपुर्ण मंदीराचा ताबा दाखवून वाद घालत आहेत. या वादामुळे अहिंसेचे पूजक समजला जाणारा जैन समाज बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोपही दिगंबर जैन मुनींनी केला. श्वेतांबरी समाजाचे काही गुंडप्रवृत्तीचे सेवक दिगंबरी जैन भक्तांना व पुजार्यांना धमकाविण्याचे काम करीत आहेत. या प्रवृत्तीला प्रशासनाने अंकुश घालुन त्यांच्यावर कारवाई करावी, जेणेकरुन मंदीर व परिसरातील शांततेचा भंग होणार नाही, अशी मागणीही निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. सद्या काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत, असे असतांना श्वेतांबर समाजातील काही मंडळी जाणीवपूर्वक वाद उत्पन्न करुन वेळोवेळी हल्ले करीत आहेत. यासोाबतच हीच मंडळी पोलिस (Washim Police) व प्रशासनावर दबाव निर्माण करुन दिगंबरी समाजावर विविध खोट्या स्वरुपाचे खटले दाखल करुन अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मोर्चाच्या प्रारंभी बालाजी मंदिरा समोरील खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर जवळील अहिंसा स्तंभ येथे दिगंबर जैन मुनि ऐल्लक श्री सिद्धांत सागरजी महाराज यांनी दिगंबर जैन समाजबांधवांना (Jain Samaj) मार्गदर्शन केले .त्यानंतर या विशाल मोर्चाचा प्रारंभ झाला. (Virat Morcha) मोर्चा बालू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ,पाटणी चौक, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ह्या मोर्चामध्ये दिगंबर जैन पंथातील हजारो स्त्री पुरुष श्रावक सहभागी झाले होते. यामध्ये त्यांच्या हातामध्ये विविध रंगात विविध फलके होती तसेच सदर मोर्चा बाबतचे माहिती देणारे मोठमोठे कट आउट सुद्धा शहरात लागले होते.
महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातून दिगंबर जैन समाजाचे (Jain Samaj) भाविक भक्त येथे दाखल झाले होते. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर तात्या भैय्या, संजय जैन, धनंजय रोकडे, आकाश महाजन, आशिष डहाळे, रितेश महाजन, अनंत गडेकर, संतोष रोकडे, सुधिर भुरे यांच्यासह महाराष्ट्रातील हजारो दिगंबर जैन श्रावकांच्या स्वाक्षर्या आहेत.