हिंगोली(Hingoli):- कयाधू नदीचे पाणी खरबी येथून बोगद्यावाटे ईसापूर धरणात सोडण्याच्या शासनाच्या प्रकल्पा विरोधात हिंगोली जिल्हा सिंचन संघर्ष समितीच्यावतीने ९ सप्टेंबरला विराट ट्रॅक्टर मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह जिल्हावासीय सहभागी झाले होते.
नांदेडचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या भूमिकेबद्दल जिल्ह्यातील नेते मंडळींचा तीव्र आक्षेप
३ सप्टेंबरला उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक ४ आ.बाळापूर कार्यकारी अभियंत्यानी खरबी वळण बंधारा, खरबी ते ईसापूर जलायश पाणी वाहन प्रणालीचे बांधकाम व अनुषंगीक कामे याकरीता निविदा प्रकाशित केली. यासाठी ९९५ कोटी ४१ लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. ४ ते १८ सप्टेंबर निविदा उपलब्ध करून २० सप्टेंबरला या निविदा उघडण्यात येणार असल्याचे निविदेत स्पष्ट करण्यात आले. खरबी बंधारा बांधल्यास हिंगोली जिल्ह्याचे अक्षरश: वाळवंट होणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हा सिंचन संघर्ष समितीच्यावतीने ९ सप्टेंबरला भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळून या मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा (Tractor March) धडकला.
हजारो जिल्हावासीय मोठ्या संख्येने सहभागी
या मोर्चात सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड.शिवाजी माने, आमदार तान्हाजीराव मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, डॉ.संतोष टारफे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, संदेश देशमुख, विनायकराव भिसे पाटील, अॅड.अजित मगर, बाळासाहेब मगर, परमेश्वर मांडगे, भानुदास जाधव, दिलीप घुगे, गणेश शिंदे, डॉ.रमेश मस्के, पंढरीनाथ ढाले, विठ्ठल चौतमल, वसीम पठाण, शेतकरी नेते रमेश शिंदे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सुधीर अप्पा सराफ, मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बि,डी बांगर माजी नगरसेवक अनिल नैनवाणी, केशव दुबे, माजी जिल्हा परिषद सदस्य माधव कोरडे, अॅड.अमोल जाधव, गजाननराव देशमुख पळशीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, भाजपाचे नेते रामदास पाटील सुमठाणकर, प्रकाश थोरात, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, गोविंद भवर, मिलींद उबाळे, सुमीत चौधरी, संजय बोंढारे पाटील, उमेश नागरे, नंदकिशोर तोष्णीवाल, सुरेश अप्पा सराफ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, बेलवाडी चे दुग्ध व्यवसायिक रामेश्वर मांडगे पाटील यांच्यासह हजारो जिल्हावासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बंधार्याला तीव्र विरोध दर्शवून वेळप्रसंगी मुंबईला ट्रॅक्टर मोर्चा नेण्याचा इशारा
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अनेक पक्षातील मान्यवरांनी खरबी बंधार्याला तीव्र विरोध दर्शवून वेळप्रसंगी मुंबईला ट्रॅक्टर मोर्चा नेण्याचा इशारा दिला. तसेच नांदेडचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण हे हिंगोली जिल्ह्यातील पाणी नांदेड जिल्ह्याला नेण्याचा घाट घालत असल्याने तीव्र शब्दात निषेध नोंदवून भाषणातून कडाडून हल्ला केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने निवेदन दिले. याप्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.