हिंगोली(Hingoli):- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात आजपासून अनेक पथके घरोघरी जाऊन दिव्यांगासह वयोवृद्धांचे मतदान करून घेणार आहेत.
अनेक पथके तैनात गृहभेटीद्वारे होणार मतदान
जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदार संघ(Assembly constituency) आहेत. आज ९ नोव्हेंबर पासून १० व ११ नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यात अनेक पथके घरोघरी जाऊन दिव्यांग(disabled) व ८५ वर्षावरील दिव्यांगाचे मतदान करून घेणार आहेत. यासाठी हिंगोली विधानसभा मतदार संघात ४४९ दिव्यांग व वयोवृद्ध मतदार आहेत. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी १८ पथके तयार केली आहेत. त्याचप्रमाणे कळमनुरी विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी १६ पथके तयार केली आहेत. या मतदार संघात दिव्यांग मतदार ५६ तर ८५ वर्षापेक्षा अधिक २५० मतदार आहेत. त्याचप्रमाणे वसमत विधानसभा मतदार संघात दिव्यांग व वयोवृद्धांच्या मतदारांसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा दळवी यांनी पथके तयार केली आहेत.
या ठिकाणी दिव्यांग मतदार ५६ तर ८५ वर्ष वयोगटातील २४५ मतदार आहेत. या पथकामध्ये एका पथक प्रमुखासह तलाठी, मंडळ अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कोतवाल व एका हत्यारी पोलीस कर्मचार्याचा समावेश आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.