जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांना दुसर्यांदा संधी नाकारली
वर्धा (BJP Sanjay Gate) : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याबाबत सर्वांनाच उत्सूकता लागलेली होती. अखेर जिल्हाध्यक्षाचे नाव जाहीर झाले आणि त्यामध्ये वर्ध्यात फेरबदल झाल्याचे दिसून आले. जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांना दुसर्यांदा संधी नाकारत संजय गाते (BJP Sanjay Gate) यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
भाजपच्या जिल्हाध्यक्षदावरून यावेळी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. जिल्हाध्यक्षपदी निवडीकरिता सुनील गफाट यांच्यासोबतच विविध नावे स्पर्धेत होती. जिल्हाध्यक्ष पदाच्या अनुषंगाने मते जाणून घेण्यात आली. मात्र निर्णय जाहीर न झाल्याने उत्सूकता ताणली गेली होती. अखेर भाजपच्या वतीने इतर जिल्ह्यांसोबतच वर्धा जिल्हाध्यक्षाच्याही नावाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये संजय गजाननराव गाते (BJP Sanjay Gate) यांची भारतीय जनता पक्ष वर्धा जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांना मात्र पक्षाकडून पुन्हा संधी नाकारण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदासाठी महिलांचीही नावे चर्चेत होती. जिल्हाध्यक्ष पदावरून नेत्यांच्याही भूमिका महत्त्वाच्या ठरल्याची शक्यता नाकारता येत नाही.
ह भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दायित्व सांभाळत असलेले संजय गाते (BJP Sanjay Gate) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून त्यांनी विविध जबाबदार्या सांभाळल्या आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे प्रदेश सहमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. महाराष्ट्र राज्य कुंभार महासंघाचे अध्यक्ष म्हणून चांगले संघटन उभे केले.
भारतीय जनता पक्षाच्या नगरस्तरापासून प्रदेश स्तरापर्यंत विविध जबाबदार्या सांभाळल्या. उत्कृष्ट संघटक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी मोर्चाचे चांगले संघटन उभे केले. मातृसेवा मंडळाचे कार्यवाह असलेले संजय गाते सेवा फॉउंडेशनचे मार्गदर्शक आहे. पुलगाव नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य होते. पुलगाव शहरामध्ये विविध सेवा कार्य सतत सुरु असतात.