वर्धा (World Bird Census) : ग्लोबल बिग डे या पक्षी गणनेच्या निमित्याने वर्धा जिल्ह्यातील विविध अधिवासात केलेल्या पक्षी निरीक्षणात ६४ पक्षी प्रजातींच्या नोंदी घेवून त्या ई-बर्डच्या संकेत स्थळावर नोंदवण्यात आल्या. पक्षी निरीक्षणासाठी जामणी येथील मदन धरण, येळाकेळी येथील धाम नदीचा किनारा, रोठा तलाव, सेवाग्राम गांव तसेच वर्धा शहरातील काही ठिकाणे समाविष्ट करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात (World Bird Census) आढळणार्या एकूण प्रक्षी प्रजाती पैकी सुमारे २१ प्रतिशत प्रजातींचे दर्शन या एक दिवसीय पक्षी गणनेमध्ये झाले.
१० मे या दिवशी असलेल्या ग्लोबल बिग डेला भारतामधील ३१ राज्यांतील पक्षी निरीक्षकांनी भाग घेतला असून २३० पक्षी प्रजातींसह महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे. यावर्षी महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील पक्षी निरीक्षकांनी आपला सहभाग नोंदविला. (World Bird Census) महाराष्ट्रात वर्धेचे स्थान बाराव्या क्रमांकावर आहे.
वर्धेत नोंदवण्यात आलेल्या पक्षी प्रजातींमध्ये (World Bird Census) जागतिक आययुसीएन या संघटनेद्वारे वर्गीकरण करण्यात आल्यानुसार असुरक्षित वर्गात मोडणारे नदी सुरय (रीवर टर्न), संकट समीप वर्गातील मोठा करवानक (ग्रेट थिक नी), पांढर्या मानेचा करकोचा (अशियन वूली-नेक्ड स्टॉर्क) तसेच हिवाळी स्थलांतरित छोटा कंठेरी चिखल्या (लिटील रिंग प्लोवर), लाल पुठ्ठ्याची भिंगरी (इस्टर्न रेड-रुम्पड श्वालो), रेषाळ कंठाची भिंगरी (स्ट्रीक-थ्रोटेड श्वालो) आढळले. राखी बगळा (ग्रे हेरॉन), हळदीकुंकू बदक (इंडिअन स्पॉट-बिल्ड डक), पिवळा तापस (येलो बिटर्ण), काळा शराटी (ब्लॅक हेडेड आयबीस) आणि टकाचोर (रुफोस ट्रीपाय) या पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या.