वर्धा(Wardha):- निवडणुकीतील भाषणात मतदारांच्या टाळ्या घेण्यासाठी व्यासपीठावरील नेते वक्तव्य करतात. देवळी मतदार संघाचे काँग्रेसचे (Congress) उमेदवार आमदार रणजीत कांबळे यांनी लाडकी बहीण योजना मध्यप्रदेश मध्ये बंद झाल्याचे प्रचारा दरम्यान बोलले.
भाजप अध्यक्षांची थेट पोलिस अधीक्षकाकडे तक्रार केली
याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. रणजीत कांबळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करताना कांबळे खोटा प्रचार करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. लाडकी बहीण योजनेची खोटी माहिती जनतेमध्ये गैरसमज पसरविणे , लोकांची दिशाभूल करणे अत्यंत गंभीर आणि निंदनीय प्रकार आहे. कांबळे यांनी राजकीय फायद्यासाठी खोट्या प्रचाराचे हत्यार वापरले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेबद्दल खोटी माहिती पसरविल्या बाबतची तक्रार शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत यांच्या विरोधात भोपाळ येथे ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली होती. भोपाळ मध्ये त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. तसाच प्रकार आता देवळी पुलगाव मतदार संघात रणजीत कांबळे यांनी केल्याची तक्रार वर्ध्यात दाखल झाली आहे.
माझ्याकडे आलेली तक्रार मी स्वीकारली…
याबाबत पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सांगितले की निवडणुकीच्या दिवसांमध्ये तक्रारी या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे कराव्या लागतात. माझ्याकडे आलेली तक्रार मी स्वीकारली. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठवली. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढील कारवाई करू. याच दरम्यान भाजप अध्यक्ष सुनील गफाट यांनी सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे. गफाट म्हणाले उमेदवारांना असे वक्तव्य करता येत नाही. निवडणूक अधिकारी त्या व्यक्तव्याचा व्हिडिओ तपासतील. निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.