दादाराव केचे यांनी केली तलवार म्यान
वर्धा(Wardha):- आर्वी मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे (Bhartiya Janta Party) आमदार दादाराव केचे यांना डावलून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांचे निकटवर्तीय सुमित वानखेडे यांना उमेदवारी बहाल केली. दादाराव केचे यांनी पक्षासोबत बंड करून अपक्ष उमेदवारी चा अर्ज सादर केला होता.
ब्रम्हदेव जरी आला तरी मी अर्ज मागे घेणार नाही..!
भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरीला थारा नाही. याची प्रचिती आज पुन्हा पाहायला मिळाली. ब्रम्हदेव जरी आला तरी मी अर्ज मागे घेणार नाही अशी वल्गना करणारे आमदार दादाराव केचे यांनी अखेर पत्र परिषद घेऊन माझा पाठिंबा सुमित वानखेडे यांना आहे असे वर्ध्यात सांगितले. दिवाळीची धामधूम सुरू असतानाच आज बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता केचे आणि आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप काळे नागपूरकडे निघाले. नागपूर वरून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर दिवे यांचे सोबत नागपूर विमानतळावरून चार्टर्ड प्लेनने अहमदाबाद गाठले . सकाळी अकरा वाजता देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा (Amit Shaha) यांच्यासोबत भेट झाली. सर्वांची ओळख परेड झाल्यावर बंद खोलीमध्ये पाच मिनिट प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आमदार केचे आणि अमित शहा यांची चर्चा झाली. बंद खोलीमध्ये दादाराव केचे यांना सन्मानाचे पारितोषिक देण्याचं ठरले.
शिष्टाई अखेर यशस्वी ठरली
पाच वाजता परत आल्यावर वर्ध्यातील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात दादाराव केचे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मी निवडणुकीत(Elections)अर्ज सादर केला होता. 1983 पासून मीच पक्ष संघटना बांधली त्या पक्ष संघटनेमध्ये कुठलाही खंड पडणार नाही माझा पाठिंबा पूर्ण सुमित वानखेडे यांना राहील. माझी अमित भाई शहा यांच्या सोबत साधक-बाधक चर्चा झाल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. सध्या तरी केचे यांना राज्याचे भाजपातील उपाध्यक्ष पद देण्यात आले.. आर्वी मतदार संघात मात्र सकाळपासूनच केचे आज अमित शहा यांना भेटायला दिल्लीला गेले अशी चर्चा रंगत होती. तर ते दिल्ली नसून अहमदाबादला गेले हे सायंकाळी माहिती पडले. अखेर आर्वीतील बंड थंड झाले.