वर्धा (Wardha) :- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचार्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने काळी फित लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचार्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचार्यांचे वेतन थकले
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समिती व आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्यावतीने पत्र देण्यात आले होते. त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे थकीत वेतन अदा करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु अजुनपर्यंत थकीत वेतनाबाबत निर्णय झालेला नाही. आयटक संलग्न नर्सेस युनियन व समायोजन कृती समितीने काळी फीत लवून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने (Department of Health) १५ वा वित्त आयोगाचे निधी दिलेला असून तसेच विविध कार्यक्रमाचे अखर्चीत निधी आपणाकडे वर्ग केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे प्रलंबित वेतन अदा करावे. १५ वा वित्त आयोगातून उसणवारी घेवून ३ महिण्याचे प्रलंबित वेतन द्यावे, तसेच समायोजनाचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने योग्य दखल न घेतल्यास प्रलंबीत वेतन व समायोजनाची प्रक्रिया १२ मेपर्यंत न केल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष दिलीप उटाणे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले.