परभणी(Parbhani) :- मणी लागली आस… धरी पंढरीची वाट… असे म्हणत हजारोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरकडे(Pandharpur) रवाना झाले. वारीत चालणार्या वारकर्यांना आरोग्य सुविधा(health facility) मिळाव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. श्री संत गजानन महाराज दिंडी आणि श्री संत नामदेव महाराज दिंडीत सहभागी वारकर्यांपैकी आरोग्याच्या समस्या जाणवलेल्या ३ हजार ३५८ वारकर्यांची तपासणी करण्यात आली.
वारकर्यांमध्ये आरोग्य विषयी जनजागृती
आषाढी वारीतील भाविकांना आरोग्य विभागामार्फत (health department) विविध सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सावंत, नोडल अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, डॉ. विद्यासागर पाटील, डॉ. मनोज दिक्षित यांच्या नियोजनात पालखी मार्गावर आरोग्य पथके तैनात करण्यात आली. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी जयश्री दिपके, कैलाश सोमवंशी यांनी वारकर्यांमध्ये आरोग्य विषयी जनजागृती केली. वारीमध्ये सहभागी वारकर्यांवर उपचार करण्यात आले. चक्कर येणे, अतिसार, ताप, अंगदुखणे, हातपाय दुखणे, डोके दुखणे यासह इतर आजारांवर उपचार करण्यात आले. गंभीर असलेल्या वारकर्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
आठ दिवसांच्या कालावधीत ३ हजार ३५८ रुग्ण तपासण्या
श्री संत गजानन महाराज पालखीत २६ जून ते २९ जून या दरम्यान सेवा पुरविण्यात आली. त्याचबरोबर श्री संत नामदेव महाराज दिंडीत १ जुलै ते ४ जुलै या दरम्यान आरोग्य पथकाने सुविधा दिली. दोन्ही दिंडीच्या आठ दिवसांच्या कालावधीत ३ हजार ३५८ रुग्ण तपासण्यात आले. यामध्ये अतिसारचे १५२, ताप २७३ आणि इतर आजारांशी संदर्भात २ हजार ९३१ वारकरी रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य तपासणी बरोबर पथकाकडून पाणी नमुने, मुक्कामाचे ठिकाण, साथरोग आदी विषयी देखील तपासण्या करण्यात आल्या. सलग दुसर्या वर्षी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही मोहिम प्रशासनाकडून हाती घेण्यात आली होती. पालखी मुक्कामी असलेल्या ठिकाणी देखील आरोग्य पथकाकडून सुविधा देण्यात आल्या.