मानोरा(Washim):- जिल्हयातील रिसोड, वाशीम व कारंजा विधानसभा मतदार संघामध्ये (Assembly constituencies) काँग्रेस (Congress) पक्षातर्फे इच्छूक असलेल्या एकूण २७ उमेदवारांनी पक्ष निरीक्षक खासदार डॉ नामदेव किरसान यांच्यापुढे मुलाखती दिल्या.
विधानसभेसाठी इच्छूक काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती
विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे. त्या निमित्ताने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांसह पदाधिकार्यांची बैठक पक्ष निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यावेळी कारंजा, रिसोड व वाशीम या विधानसभा मतदार संघात इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष आ अमित झनक, जिल्हा प्रभारी देवानंद पवार, प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज, प्रदेश सरचिटणीस दिलीप सरनाईक, प्रदेश सचिव दिलीप भोजराज, जि. प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे, वरीष्ठ जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेखार पटेल, कारंजा तालुकाध्यक्ष विजय देशमुख, मानोरा तालुकाध्यक्ष अमोल तरोडकर व जिल्हा संघटक रामनाथ राठोड, गोपाल पाटील चिस्तलकर यांची उपस्थिती होती. यानंतर जिल्हयातील तिन्हीही विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्यांशी पक्ष निरीक्षक खा. डॉ किरसान यांनी चर्चा करून इच्छुक उमेदवाराबद्दल मते जाणून घेतली.